Other

जामनेरच्या वीज प्रश्नांवर ना. गिरीशभाऊ महाजन यांचा दणका!

जामनेरच्या वीज प्रश्नांवर ना. गिरीशभाऊ महाजन यांचा दणका!

महावितरण अधिकाऱ्यांची कानउघाडणी; स्वतंत्र उपविभाग, नवीन कार्यालये आणि १३२ केव्ही उपकेंद्राला मिळणार गती

जामनेर | विशेष प्रतिनिधी : जामनेर तालुक्यातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, जळणारे ट्रान्सफॉर्मर, कमी दाबाची वीज आणि त्यामुळे शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास या गंभीर प्रश्नांची राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांनी थेट दखल घेत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीस महावितरणचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलानी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जामनेर शहर व तालुक्यातील वीजपुरवठ्याची सद्यस्थिती, वाढते बिघाड, वारंवार जळणारे ट्रान्सफॉर्मर आणि कमी दाबामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

यावेळी नागरिकांना अखंडित, दर्जेदार आणि स्थिर वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट निर्देश ना. महाजन यांनी अधिकाऱ्यांना दिले. समस्या केवळ नोंदवून ठेवायच्या नाहीत, तर त्यांचे त्वरित निराकरण झाले पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी बैठकीत मांडली.

बैठकीत जामनेर येथे स्वतंत्र महावितरण उपविभाग निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच तालुक्याची वाढती लोकसंख्या आणि विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र लक्षात घेऊन किमान तीन नवीन शाखा कार्यालये सुरू करण्याच्या प्रक्रियेलाही गती देण्याचे निर्देश देण्यात आले. या निर्णयामुळे नागरिकांच्या तक्रारींचे स्थानिक पातळीवर जलद निराकरण होऊन प्रशासन अधिक कार्यक्षम होणार आहे.

याशिवाय जळगाव सर्कलची वाढती व्याप्ती लक्षात घेता भुसावळ येथे स्वतंत्र सर्कल कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव पुढे नेण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. यासाठी मंत्रालय स्तरावर विशेष बैठक घेऊन या प्रस्तावास मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

तालुक्याच्या भविष्यातील वाढत्या वीज गरजांचा विचार करून जामनेरमध्ये १३२ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र उभारण्याबाबतही विस्तृत चर्चा करण्यात आली. हे उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर वारंवार होणारे वीज खंडित होणे, कमी दाबाची समस्या आणि तांत्रिक अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून जामनेरच्या वीज व्यवस्थेला दीर्घकालीन बळकटी मिळणार आहे.

बैठकीदरम्यान महावितरण अनुसंसाधनचे संचालक राजेंद्र पवार तसेच संचालक धनंजय ओंढेकर यांच्याशी विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जामनेर तालुक्याच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि तांत्रिक सुधारणा तातडीने करण्यावर भर देण्यात आला.

ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या या निर्णायक हस्तक्षेपामुळे जामनेर तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून येत्या काळात वीज वितरण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊन नागरिकांना अधिक दर्जेदार, स्थिर आणि अखंडित वीजपुरवठा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button