Sport

JCL-2026 : ओम भोसले @ १७०, अमळनेर सुहास जायंट्स फायनलमध्ये!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित आणि ‘रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’ पुरस्कृत जळगाव क्रिकेट लीग (JCL T-20) मध्ये रविवारी होणाऱ्या महाअंतिम सामन्याचा पहिला दावेदार निश्चित झाला आहे. पहिल्या क्वालिफायर लढतीत अमळनेर सुहास जायंट्सने जळगाव कोगटा किंग्सचा पराभव करत अंतिम फेरीत धडाक्यात प्रवेश केला. कोगटा किंग्सच्या ओम भोसलेने ठोकलेली १७० धावांची विक्रमी खेळी अमळनेरच्या सांघिक कामगिरीपुढे अपयशी ठरली.

ओम भोसलेचे ऐतिहासिक शतक
नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा अमळनेरचा निर्णय सुरुवातीला चुकीचा वाटू लागला होता. जळगाव कोगटा किंग्सच्या ओम भोसलेने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत केवळ ७४ चेंडूत नाबाद १७० धावा कुटल्या. या खेळीत त्याने १० उत्तुंग षटकार आणि १७ चौकारांची आतषबाजी केली. अक्षय मेघानी (२१), जितेंद्र नाईक (२०) आणि बिपिन चांगरे (१३) यांच्या साथीने कोगटा किंग्सने २० षटकांत ३ बाद २४२ धावांचा हिमालय उभा केला. अमळनेरकडून केशव ठाकूरने २ बळी घेतले.

अमळनेरचे ‘जायंट’ प्रत्युत्तर
२४३ धावांचे विशाल लक्ष्य समोर असताना अमळनेरच्या फलंदाजांनी हार न मानता आक्रमक पवित्रा घेतला. मानव ट्रिबरेवाल : ६४ धावा (२९ चेंडू, ६ षटकार), रणजीत निकम : ७६ धावा (२८ चेंडू, ५ षटकार, ७ चौकार), शुभम शर्मा (कर्णधार) : ६५ धावा (३० चेंडू, ३ षटकार, ७ चौकार) मानव आणि ऋषी यादवने पाया रचल्यानंतर रणजीत निकम आणि कर्णधार शुभम शर्मा यांनी स्फोटक भागीदारी करत अवघ्या १८.३ षटकांत लक्ष्य गाठले. ७६ धावांच्या खेळीसाठी रणजीत निकम याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

पाचोरा एसकेटी योद्धाजचा अमळनेरकडून पराभव
याआधी झालेल्या १५ व्या लीग सामन्यात अमळनेर सुहास जायंट्सने पाचोरा एसकेटी योद्धाजवर ६७ धावांनी मात केली होती. शुभम शर्मा (६९) आणि अजय पाटील (६९) यांच्या फलंदाजीच्या जोरावर अमळनेरने १९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाचोराचा संघ १२९ धावांवर गारद झाला. अमळनेरच्या सतिश चतुर्वेदीने १८ धावांत ४ बळी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयामुळेच अमळनेरला गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवून क्वालिफायर खेळण्याची संधी मिळाली होती.

दुसरी क्वालिफायर लढत आज दि.२५ एप्रिल रोजी जैन ड्रीम स्पेसेसच्या मैदानावर रंगणार आहे. यातील विजेता संघ रविवारी होणाऱ्या ‘ग्रॅण्ड फायनल’ मध्ये अमळनेर सुहास जायंट्सशी भिडणार आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button