आषाढीनिमित्त कुऱ्हा येथे साकारणार ‘प्रतिपंढरपूर’; हजारो भाविकांना विठ्ठल दर्शनाची पर्वणी
कोरोना काळात सुरू झालेला उपक्रम सहाव्या वर्षात; धार्मिक सोहळे, दिंड्या, कीर्तन व अन्नदानाचे आयोजन

आषाढीनिमित्त कुऱ्हा येथे साकारणार ‘प्रतिपंढरपूर’; हजारो भाविकांना विठ्ठल दर्शनाची पर्वणी
कोरोना काळात सुरू झालेला उपक्रम सहाव्या वर्षात; धार्मिक सोहळे, दिंड्या, कीर्तन व अन्नदानाचे आयोजन
मुक्ताईनगर | सुभाष धाडे
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा (काकोडा) येथे देवशयनी आषाढी एकादशी निमित्त शनिवारी (दि. २५ जुलै) भव्य ‘प्रतिपंढरपूर’ सजीव देखावा साकारला जाणार आहे. कोरोना महामारीच्या काळात सुरू झालेला हा अनोखा धार्मिक उपक्रम यंदा सहाव्या वर्षात प्रवेश करत असून, परिसरातील हजारो भाविकांना विठुरायाच्या दर्शनाची पर्वणी मिळणार आहे.
लोकनियुक्त सरपंच डॉ. बी. सी. महाजन यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. पंढरपूरला प्रत्यक्ष जाऊ न शकणाऱ्या वारकरी, ज्येष्ठ नागरिक आणि भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाचा अनुभव आपल्या गावातच मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. गेल्या पाच वर्षांत या सोहळ्याला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, कुऱ्हा गावाची ओळख ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून निर्माण झाली आहे.
दिंडी, महापूजा, कीर्तन आणि अन्नदान
दशमीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पांडुरंगाच्या मूर्तीची भव्य दिंडी काढून विधिवत प्रतिष्ठापना केली जाईल. त्यानंतर महापूजा, अन्नदान आणि कीर्तनाचा कार्यक्रम होईल. एकादशीच्या दिवशी पहाटे महापूजा, काकडा आरती, विष्णुसहस्त्रनाम, दर्शनबारी, फराळ वाटप, दिंडी सोहळे, प्रवचन, हरिपाठ आणि रात्री ह.भ.प. कडुदास महाराज भोजने यांचे कीर्तन होणार आहे. दुसऱ्या दिवशी नैवेद्य समर्पणानंतर सोहळ्याची सांगता होईल.
कोरोना महामारीमुळे वारकऱ्यांना पंढरपूरला जाता येत नसल्याने डॉ. बी. सी. महाजन आणि त्यांच्या पत्नी माधुरी महाजन यांनी गावातच पंढरपूरचा भक्तिमय अनुभव निर्माण करण्याचा संकल्प केला. वारकरी संप्रदायातील मंडळींच्या सहकार्याने सुरू झालेला हा उपक्रम आज परिसरातील मोठा धार्मिक सोहळा बनला आहे.
सामाजिक कार्याची परंपरा
डॉ. बी. सी. महाजन हे यशस्वी उद्योजक असून सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवितात. आरोग्य शिबिरे, अन्नदान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विविध सामाजिक उपक्रमांमधून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
यंदाच्या प्रतिपंढरपूर सोहळ्यासाठी परिसरातील वारकरी, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.





