विधान परिषद निवडणूक : भाजपचे १० उमेदवार जाहीर, जळगावातून नंदू महाजन यांना संधी

महा पोलीस न्यूज | चेतन वाणी । महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६ साठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील द्विवार्षिक निवडणुका आणि नागपूर येथील पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने एकूण १० उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे. या यादीत जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नंदकिशोर (नंदू) महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जळगाव विधान परिषद मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात राजकीय चर्चांना उधाण आले होते. दोन्ही पक्षांकडून या जागेवर दावा केला जात असताना अखेर महायुतीच्या जागावाटपाच्या सूत्रानुसार ही जागा भाजपकडे कायम राहिली आणि पक्षाने नंदकिशोर महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली येथून अरुण लाखाणी, भंडारा-गोंदिया येथून अविनाश ब्राह्मणकर, अमरावती येथून प्रवीण पोटे पाटील, सांगली-सातारा येथून धैर्यशील कदम, सोलापूर येथून राजेंद्र राऊत, अहिल्यानगर येथून प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीनगर-जालना येथून सुहास शिरसाट, नांदेड येथून अमर राजूरकर, धाराशिव-लातूर-बीड येथून बसवराज पाटील आणि जळगाव येथून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उमेदवारी जाहीर होताच जळगाव जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध ठिकाणी समर्थकांनी जल्लोष केला. नंदकिशोर महाजन हे सोमवार, १ जून रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून या वेळी महायुतीचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील १७ विधान परिषद जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जाहीर केलेली ही उमेदवारांची यादी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून आता सर्वांचे लक्ष उमेदवारी अर्ज प्रक्रिया आणि पुढील राजकीय समीकरणांकडे लागले आहे.






