Other

सहा दिवसांचा संसार क्षणात उद्ध्वस्त; माहेरी निघालेल्या नववधूचा अपघातात मृत्यू

जळगाव शहरातील विद्यापीठासमोरील रस्त्यावर भरधाव चारचाकीची धडक; काका गंभीर जखमी, दोन्ही कुटुंबांवर शोककळा

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । लग्नाच्या अवघ्या सहा दिवसांनंतर नव्या संसाराची स्वप्ने एका क्षणात उद्ध्वस्त करणारी हृदयद्रावक घटना सोमवारी जळगाव शहरात घडली. माहेरी जाण्यासाठी निघालेल्या २१ वर्षीय नवविवाहितेचा भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. या अपघातात तिच्यासोबत असलेले काका गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृत तरुणीचे नाव वैशाली भाऊसाहेब पाटील (वय २१, रा.कोळपिंप्री, ता.अमळनेर) असे आहे. त्यांचा विवाह ७ जुलै रोजी जळगावातील देवराम नगर परिसरात राहणारे पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर नवदांपत्याने धार्मिक विधी व देवदर्शनाचा कार्यक्रमही पूर्ण केला होता. नव्या आयुष्याची सुरुवात आनंदात होत असतानाच नियतीने क्रूर घाला घातला.

सोमवारी वैशाली यांना माहेरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे काका जळगाव येथे आले होते. दुपारचे जेवण झाल्यानंतर दोघेही दुचाकीवरून कोळपिंप्रीकडे रवाना झाले. दुपारी सुमारे चारच्या सुमारास जळगाव शहरातील विद्यापीठासमोरील रस्त्यावरून जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की वैशाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे काका गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच दोन्ही कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. काही दिवसांपूर्वीच मोठ्या आनंदात विवाह झालेल्या मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. आनंदाने गजबजलेले दोन्ही कुटुंब क्षणार्धात शोकसागरात बुडाले. या घटनेने परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून अपघातानंतर पसार झालेल्या चारचाकी वाहनाचा शोध सुरू आहे. संबंधित वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button