अट्टल दुचाकी चोरटा जेरबंद, तीन दुचाकी जप्त ;एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई


अट्टल दुचाकी चोरटा जेरबंद, तीन दुचाकी जप्त ;एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई
जळगाव: एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत भुसावळ येथून एका अट्टल दुचाकी चोरट्याला शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एकूण ९५ हजार रुपये किमतीच्या ३ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्या नगर येथील रहिवासी मनोज शंकराव गरुड यांची ‘सीबी शाईन’ (MH-19 DD 8323) ही दुचाकी त्यांचा मुलगा प्रथम गरुड याने १४ ऑगस्ट रोजी एमआयडीसी परिसरातील ‘व्हि. सेक्टर लिड्स इंडस्ट्रीज’ कंपनीबाहेर पार्क केली होती. सायंकाळी काम संपवून बाहेर आला असता दुचाकी गायब असल्याचे दिसले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. ६७०/२०२६, BNS कलम ३०३(२)) नोंदवण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवून उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तैनात केले. या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत मोहम्मद शहा अस्लम शहा या संशयिताला भुसावळ येथून ताब्यात घेतले.
३ दुचाकी आणि ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त
सीबी शाईन (MH-19 DD 8323): किंमत २५,००० रुपये,हिरो स्प्लेंडर (क्रमांक नसलेली): किंमत २०,००० रुपये (एमआयडीसी गु.र.नं. १७९/२०२६ मधील चोरी)बजाज सीटी १०० (क्रमांक नसलेली): किंमत ५०,००० रुपये
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व पो.नि. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय चंद्रकांत धनके, श्रेणी पीएसआय विजयसिंग पाटील, गिरीष पाटील, किरण चौधरी, प्रमोद लाडवंजारी, विशाल कोळी आणि योगेश घुगे यांच्या पथकाने केली.







