ब्रेकिंग : जळगावात पुन्हा एमडी ड्रग्जविरोधात मोठी कारवाई, तिघांविरुद्ध गुन्हा
‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत स्थानिक गुन्हे शाखेची प्रभावी मोहीम : ३.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त, मुख्य पुरवठादाराचा शोध सुरू

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या ‘नशामुक्त भारत’ अभियानाला मोठे यश मिळाले असून, स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) एमडी (मेफेड्रोन) या अंमली पदार्थाच्या तस्करीवर मोठा प्रहार केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील जी.एस. ग्राऊंड परिसरात टाकलेल्या सापळ्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन व मोटारसायकल असा एकूण ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेला अमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन याविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी आपल्या पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे सातत्याने कारवाया करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
गुप्त माहितीवरून पहाटे सापळा
१० जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे २.३५ वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली की, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील शासकीय तांत्रिक विद्यालयाशेजारील जी.एस. ग्राऊंडच्या प्रवेशद्वाराजवळ काही इसम एमडीची तस्करी करीत आहेत. माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचला. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तिघा संशयितांना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापैकी एकाने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. उर्वरित दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कायदेशीर तपासणी करण्यात आली.
५६.२९ ग्रॅम एमडी पावडर, दुचाकी जप्त
तपासणीदरम्यान आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या पावडरची घटनास्थळी उपस्थित फॉरेन्सिक पथकाने तपासणी केली असता ती मेफेड्रोन (एमडी) असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) किंमत २ लाख ८१ हजार ५४० रुपये, हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (MH-19-DJ-0132) किंमत २५ हजार रुपये अशा प्रकारे एकूण ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन आरोपी अटकेत, एक फरार
या कारवाईत जयेश देविदास तायडे (वय २७, रा. हरी ओम नगर, मोहन टॉकीजजवळ, जळगाव) आणि हितेंद्र शिवाजी परदेशी (वय ३१, रा. कांचन नगर, जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत आरोपींनी फरार आरोपी भैय्या सोनवणे (रा. कांचन नगर, जळगाव) याच्याकडून विक्रीसाठी एमडी घेतल्याची कबुली दिली असून, त्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून कसून शोध सुरू आहे.
मुख्य आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्हे
अटक करण्यात आलेल्या जयेश देविदास तायडे याच्याविरुद्ध यापूर्वीही खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, गंभीर दुखापत आणि दरोडा अशा स्वरूपाचे चार गंभीर गुन्हे रामानंद नगर, जिल्हापेठ आणि जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०२१७/२०२६ अन्वये एनडीपीएस अधिनियम १९८५ मधील कलम ८(क), २२(क) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या पथकाने पार पाडली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सहाय्यक फौजदार हेमराज भावसार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अकरम शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल मुरलीधर धनगर, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण भालेराव, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल छगन तायडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप सपकाळे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल रगडे आणि पोलीस कॉन्स्टेबल उदय कापडणे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावत कारवाई यशस्वी केली.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
परिसरात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल. अंमली पदार्थमुक्त समाज घडविण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.
अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल. अंमली पदार्थमुक्त समाज घडविण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.
या पथकाने बजावली उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पार पडली.
कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार हेमराज भावसार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अकरम शेख, मुरलीधर धनगर, प्रविण भालेराव, महेश महाजन, विजय पाटील, किशोर पाटील, छगन तायडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप सपकाळे, राहुल रगडे आणि उदय कापडणे यांनी सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी बजावली.





