CrimeDetection

अमळनेर पोलिसांचा मध्यरात्री थरारक ‘सर्जिकल स्ट्राईक’!

कोंबिंग ऑपरेशनने गुन्हेगारी जगताची दाणादाण ; ५ पथके, १०० हून अधिक जवानांचा फौजफाटा

अमळनेर पोलिसांचा मध्यरात्री थरारक ‘सर्जिकल स्ट्राईक’!

कोंबिंग ऑपरेशनने गुन्हेगारी जगताची दाणादाण ; ५ पथके, १०० हून अधिक जवानांचा फौजफाटा

गावठी कट्टा, लाखो रुपयांचा गुटखा व दारूसह ४० हून अधिक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

अमळनेर I प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  श्रीकांत धिवरे यांच्या आदेशावरून अमळनेर शहरात गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी मध्यरात्री एकाच वेळी ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले. पहाटे २:३० ते सकाळी ७:०० वाजेदरम्यान अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या थेट नेतृत्वात या मोहिमेने संपूर्ण शहराला वेढा घातला होता. ५ वेगवेगळ्या पथकांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अमळनेरमधील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

मोठ्या फौजफाट्यासह मध्यरात्री ‘अॅक्शन’

या मोहिमेसाठी अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह ५ दुय्यम अधिकारी, ४० अंमलदार, उपविभागातील ३० अंमलदार, स्थानिक गुन्हे शाखेचे १० जवान आणि आर.सी.पी.च्या ३ प्लाटून असा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी सर्व पथकांना गुप्त सूचना देऊन एकाच वेळी वेगवेगळ्या भागात छापे टाकण्याचे आदेश दिले.

अवैध गुटख्याच्या अड्ड्यांवर पोलिसांची झडती

शहरातील अवैध गुटखा साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली. यात सुगनोमल किशनचंद बठेजा (रा. सिंधी कॉलनी, चोपडा रोड) आणि आकाश बाबूलाल सोनवणे (रा. फरशी पूल) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून तब्बल *५२,५०० रुपयांचा* प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि गुटखा जप्त करण्यात आला.

गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

दारूबंदी कायद्यांतर्गत पोलिसांनी शहरात व परिसरात मोठी कारवाई करत ८ वेगवेगळे गुन्हे दाखल केले. करत्तारसिंग तरशेमसिंग शिख (तांबेपुरा), निशीकांत प्रभाकर शिरसाठ (पैलाड), कैलास अमृत भिल (ताडेपुरा), राजेंद्र कांतीलाल शिंदे (नगाव), सुलोचना भाईदास भिल (म्हाडा कॉलनी), रुपा विक्की बाटुंगे (धरणगाव रोड), योगेश हरी भोई (भोईवाडा) आणि आनंद ईश्वर सोनवणे (पिंपळी) यांच्यावर गुन्हे दाखल झाले. पोलिसांनी कारवाई दरम्यान १२,००० लीटर कच्चे-पक्के रसायन आणि २,९५० लीटर गावठी हातभट्टीची तयार दारू मिळून एकूण ८,९५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला.

गावठी कट्ट्यासह ३ आरोपींना बेड्या

या मोहिमेतील सर्वात मोठी यशस्विता म्हणजे अमळनेर आणि चोपडा शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने एका घातक गुन्ह्याचा पर्दाफाश केला. पोलिसांनी कारवाई करत ०१ अग्रिशस्त्र (गावठी कट्टा), ०२ मॅगझीन आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत. या प्रकरणी ३ अट्टल आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयीन वॉरंटची कडक अंमलबजावणी

पोलिसांनी न्यायालयातून जारी झालेल्या ७ पकड वॉरंटची अंमलबजावणी करत विशाल दशरथ चौधरी (भोईवाडा), महेंद्र संतोष भोई (रुबजी नगर), राजेश ऊर्फ सोनल घोडेवाला (शिवशक्ती चौक) यांच्यासह इतर चार अशा एकूण ७ जणांना अटक केली. तसेच इतर ९ जणांविरुद्धच्या जामीनपात्र वॉरंटची देखील बजावणी करण्यात आली.

अट्टल गुन्हेगारांची कसून चौकशी

अमळनेर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील (रेकॉर्डवरील) ११० संशयित आणि अट्टल गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान ७० आरोपी पोलिसांच्या हाती लागले. त्यांना थेट पोलीस ठाण्यात आणून त्यांचे ‘इन्ट्रागेशन फॉर्म’ भरून घेण्यात आले, ज्यामुळे आगामी काळातील गुन्ह्यांना आळा बसेल. तसेच आधीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या १२ पाहिजेत असलेल्या आरोपींना बेड्या ठोकून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या धडक आणि धडाकेबाज कामगिरीमुळे अमळनेर शहरात गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमधून पोलिसांचे कौतुक होत आहे. सर्व प्रकरणांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button