
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक समस्यांच्या पार्श्वभूमीवर आज जळगाव शहरात पोलिस विभागाची महत्त्वपूर्ण बैठक पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीत शहरातील सहा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, वाहतूक शाखेचे अधिकारी तसेच वाहतूक व्यवस्थेची जाण असलेले अंमलदार उपस्थित होते.
बैठकीमध्ये पोलीस स्टेशननिहाय वाहतूक समस्यांचा सखोल आढावा घेण्यात आला. शहरातील विविध भागांमध्ये निर्माण होणारे वाहतूक जॅमिंग पॉइंट, रस्त्यांवरील अतिक्रमण, बाजारपेठांमधील वाढती गर्दी, अनियंत्रित पार्किंग आणि सिग्नल व्यवस्थेतील त्रुटी यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.
यावेळी शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी विविध उपाययोजनांवरही विचारमंथन करण्यात आले. विशेषतः हॉकर्स व्यवस्थापन, रस्त्यांवर आवश्यक सूचना फलक व येलो स्ट्रिप्स लावणे, बंद असलेले सिग्नल सुरू करणे तसेच नवीन सिग्नल बसविणे, वन वे व्यवस्था, इव्हन-ऑड पार्किंग प्रणाली, रंब्लर्स व स्पीडब्रेकर्सची आवश्यकता यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
या सर्व समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पोलिस विभागाकडून विस्तृत फोटो आणि व्हिडिओसह प्रेझेंटेशन तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांची वेळ देखील घेण्यात आली असून, दिनांक १६ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत पोलिस विभाग शहरातील वाहतूक व्यवस्थेचा सविस्तर आराखडा सादर करणार असून, विविध विभागांच्या समन्वयातून शहरातील वाहतूक प्रश्नांवर ठोस निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






