आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
भडगाव | प्रतिनिधी मतदारसंघात राबविण्यात आलेल्या विकासकामांमुळे तसेच आमदार किशोर पाटील यांच्या जनहिताभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजप युवा मोर्चाचे उपजिल्हाध्यक्ष विकास महाजन आणि नरेंद्र सूर्यवंशी यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन्ही कार्यकर्त्यांचे पक्षात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.
यावेळी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी बोलताना आमदार किशोर पाटील यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीने प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा, विविध विकासकामे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आमदार पाटील यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा यामुळे तरुणांमध्ये त्यांच्या नेतृत्वाविषयी विश्वास निर्माण झाला असून, विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी शिवसेनेची वाट निवडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पक्षप्रवेश कार्यक्रमाला गटनेते लखीचंद पाटील, नगरसेवक जितेंद्र आचारी, सुधाकर पाटील, महेंद्र ततार, रविंद्र पाटील, नितीन महाजन, सचिन पाटील, कुणाल पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे भडगाव शहरासह परिसरातील शिवसेना संघटनेला अधिक बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, आगामी काळात आणखी अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, “विकासाच्या विचाराला साथ, किशोरआप्पांच्या नेतृत्वावर विश्वास” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि नव्या कार्यकर्त्यांचे शिवसेना परिवारात जल्लोषात स्वागत करण्यात आले.






