
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर धडक कारवाई करत तब्बल २८ लाख ६९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एक मालवाहू वाहनासह मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला हस्तगत करण्यात आला असून, वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत दिलेल्या सूचनांनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगावचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना दि. ९ जून रोजी गोपनीय माहिती प्राप्त झाली की, महाराष्ट्र राज्यात विक्री, वाहतूक व साठवणुकीस प्रतिबंधित असलेला गुटखा वाहून नेणारे एक वाहन जळगाव शहरातून जाणार आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पोहेका गिरीश पाटील, पोहेका प्रमोद लाडवंजारी आदींचे विशेष पथक तयार करून आवश्यक सूचना दिल्या व संबंधित वाहनाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
सापळा रचून पकडला माल
गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने जळगाव शहरातील अजिंठा चौक ते इच्छादेवी चौक दरम्यान महामार्गावरील जिओ पेट्रोलपंप परिसरात सापळा रचला. यावेळी एक संशयित चारचाकी मालवाहू वाहन आढळून आल्यानंतर पोलिसांनी ते वाहन थांबविले. वाहन चालकास वाहनात कोणता माल आहे याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पथकाने वाहनाची सखोल तपासणी केली असता वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्री, वाहतूक व साठवणुकीस प्रतिबंधित असलेला सुगंधित विमल पानमसाला व इतर प्रतिबंधित अन्नपदार्थांचा मोठा साठा आढळून आला.
२९ लाखांचा मुद्देमाल जप्त
याबाबत तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. तसेच अन्न व औषध प्रशासन, जळगाव विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. चौकशीत वाहन चालकाचे नाव जोगेंद्र भिका पाटील (रा. फुलपाट, ता. धरणगाव) असल्याचे समोर आले. त्याच्या ताब्यातील चारचाकी मालवाहू वाहनाच्या मागील बाजूस महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या पानमसाल्याचा साठा विक्री व वाहतुकीसाठी ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत पोलिसांनी २१ लाख ६९ हजार ६०० रुपये किंमतीचा प्रतिबंधित विमल सुगंधित गुटखा व पानमसाल्याच्या ५८ गोण्या तसेच ७ लाख रुपये किंमतीचे महिंद्रा कंपनीचे पांढऱ्या रंगाचे बोलेरो पिकअप मालवाहू वाहन (क्र. MH-19-CX-3280) असा एकूण २८ लाख ६९ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसात गुन्हा दाखल
सदर वाहन चालक जोगेंद्र भिका पाटील याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७५/२०२६ अन्वये अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम २६(२), ३०(अ), २६(२)(४), अन्न सुरक्षा आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या दि. १६ जुलै २०२५ च्या अधिसूचनेचे उल्लंघन तसेच भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७५, २७४ व २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व पोहेका योगेश धुगे करीत आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी हजर
संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे संतोष कांबळे (सहा. आयुक्त), आकांक्षा खालकर, अमोल जगताप, योगराज सूर्यवंशी आणि पल्लवी कठे यांनीही या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याविरोधातील ही कारवाई जळगाव पोलिसांची मोठी यशस्वी कारवाई मानली जात असून, अवैध व्यवसायांवर भविष्यातही अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.





