ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर अमळनेरात पोलिसांचा रूट मार्च


ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर अमळनेरात पोलिसांचा रूट मार्च
संवेदनशील भागात पोलिसांचे शक्तिप्रदर्शन; ११ अधिकारी, १२५ अंमलदारांसह QRT व दंगा नियंत्रण पथक सहभागी
अमळनेर | प्रतिनिधी : आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात सोमवारी (२४ ऑगस्ट) पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी संचलन करत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा संदेश दिला.
आज सकाळी १० ते ११.२० वाजेच्या दरम्यान हा रूट मार्च काढण्यात आला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या उपस्थितीत पोलिसांनी शहरातील विविध संवेदनशील भागांतून संचलन केले.
यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाच कंदील चौक, दगडी दरवाजा, सराफ बाजार, पानखिडकी, वाडी चौक, कसाली डीपी, आखाडा मकान, झामी चौक, पवन चौक, तिरंगा चौक आणि गांधलीपुरा चौकी या परिसरांचा समावेश होता.
रूट मार्चमध्ये अमळनेर पोलीस ठाण्याचे ६ अधिकारी व ४८ अंमलदार, मारवड पोलीस ठाण्याचे २ अधिकारी व १५ अंमलदार, एरंडोल पोलीस ठाण्याचे १ अधिकारी व १० अंमलदार, धरणगाव पोलीस ठाण्याचे १ अधिकारी व ३ अंमलदार सहभागी झाले.
तसेच चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे ३, चोपडा शहर पोलीस ठाण्याचे ३ अंमलदार, पोलीस मुख्यालयातील दंगा नियंत्रण पथकाचे ३ कर्मचारी आणि १ QRT पथक सहभागी झाले. एकूण ११ अधिकारी व १२५ अंमलदारांचा रूट मार्चमध्ये सहभाग होता. याशिवाय जळगाव पोलीस मुख्यालयाचे बँड पथक देखील उपस्थित होते.
ईद-ए-मिलाद सण शांततेत पार पडावा आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलिसांनी संवेदनशील भागांची पाहणी करत नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण केला. रूट मार्चमुळे पोलिस यंत्रणा सणाच्या पार्श्वभूमीवर सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला.







