Crime

‘कॉर्पोरेट जिहाद’ बाबत सखोल चौकशीची मागणी; जळगावात हिंदू जनजागृती समितीचे निवेदन

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । नाशिक येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत (MNC) महिला कर्मचाऱ्यांवरील कथित छळ आणि गैरवर्तनाच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

समितीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित कंपनीत काही महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक छळ, दबाव आणि अन्य गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर केवळ वैयक्तिक गुन्हा म्हणून न पाहता, प्रकरणाची व्यापक आणि निष्पक्ष चौकशी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, या प्रकरणात काही गुन्हे नोंदविण्यात आले असून काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. तसेच या संदर्भात विशेष तपास पथक (SIT) नेमण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. इतर शाखांमध्येही तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. विशेषतः कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम २०१३ (POSH Act) अंतर्गत अंतर्गत तक्रार समिती (ICC) कार्यरत होती का आणि तक्रारींवर योग्य ती कारवाई झाली का, याची चौकशी व्हावी.

समितीने प्रशासनाकडे निवेदन देत, या प्रकरणाची अनुभवी अधिकाऱ्यांमार्फत सखोल आणि वेळबद्ध चौकशी करण्यात यावी, गुन्ह्यात दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, संबंधित कंपनीसह तिच्या इतर शाखांची तपासणी करण्यात यावी, पीडित महिलांना कायदेशीर मदत, सुरक्षा आणि समुपदेशन उपलब्ध करून द्यावे, तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवून त्यांचे संरक्षण सुनिश्चित करावे, कंपन्यांमध्ये महिला सुरक्षा व तक्रार निवारण यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत आहेत का, याचे विशेष ऑडिट करावे, याशिवाय, कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दबाव, भेदभाव किंवा सक्ती होणार नाही यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी आणि संबंधितांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या सायली पाटील, गायत्री बारी, स्वाती काकडे, अनिता पोळ, ज्ञानेश्वर पाटील, विनोद शिंदे, भूषण पाटील, धनश्री दहिवदकर, वैष्णवी दैवज्ञ आदी उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button