CrimeDetection

‘बटाटा’सह चौघांची दहशत : जळगाव तालुका पोलिसांनी २ तासांत ठोकल्या बेड्या!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव तालुका पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना अवघ्या दोन तासांच्या आत अटक करण्यात यश आले आहे. या धाडसी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ११ जून २०२६ रोजी पहाटे १.३० ते ३.४५ वाजेच्या दरम्यान फिर्यादी चेतन प्रकाश पाटील (वय ३५, रा. खोट नगर, जळगाव) हे त्यांच्या साथीदारांसह मोटरसायकलने जळगाव-पाळधी रोडवरून प्रवास करत होते. यावेळी हॉटेल साई गार्डन व हॉटेल राधिका परिसरात चार तरुणांनी त्यांची मोटरसायकल अडवली.

चौघांना धाक दाखवून लुटले
आरोपींनी फिर्यादी चेतन पाटील यांच्यासह किशोर लक्ष्मण कोळी (रा. बांभोरी, ता. धरणगाव, ह.मु. साई नगर, जळगाव), भुषण पंडीत महाजन (रा. श्रीरत्न कॉलनी, जळगाव) आणि परेश अशोक अमृतकर यांना चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच शिवीगाळ व दमदाटी करून त्यांच्या खिशातील एकूण ७ हजार ८०० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली. यानंतर आरोपींनी मोटरसायकलची तोडफोड करून घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७८/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(८), १२६, ११५(२), ३५१(२), ३५२, ३२८(४) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दोन तासात चौघांना अटक
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी तातडीने डीबी पथकाला आरोपींच्या शोधासाठी रवाना केले. पथकाने तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार व स्थानिक माहितीच्या आधारे अवघ्या दोन तासांत चारही संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. पोलिसांनी चेतन उर्फ बटाटा रमेश सुशीर (वय २१, रा. संत मिराबाई नगर, जळगाव), उमाकांत दत्तात्रेय जाधव (रा. संत मिराबाई नगर, जळगाव), गौरव संजय जाधव (वय २१, रा. साई नगर, जळगाव), रोशन भगवान पाटील (वय २६, रा. पांडुरंग नगर, जळगाव) यांना अटक केली आहे.

दोघे आरोपी सराईत गुन्हेगार
अटक करण्यात आलेला चेतन उर्फ बटाटा रमेश सुशीर हा पोलीस अभिलेखावरील हिस्ट्रीशीटर असून त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर उमाकांत दत्तात्रेय जाधव हा देखील सराईत गुन्हेगार असून त्याला पूर्वी तडीपार करण्यात आले होते. त्याच्यावर जिल्हापेठ, जळगाव शहर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत डीबी पथकातील सहाय्यक फौजदार सुनील पाटील, पोलीस हवालदार योगेश पाटील, अविनाश देवरे, कैलास इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण कोळी, दीपक देवरे, किरण पाटील तसेच वाहन चालक पोहेकॉ पंकज देशमुख यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे करीत आहेत.

चाकूचा धाक दाखवत लूटमार करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना केवळ दोन तासांत अटक करून जळगाव तालुका पोलिसांनी गुन्हेगारांवर प्रभावी वचक निर्माण केल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button