
जिल्हा क्रीडा संकुल सर्वांसाठी मोफत उपलब्ध करावे; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)ची मागणी
खेळाडू व मॉर्निंग वॉक करणाऱ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्काला विरोध; अन्यथा आंदोलनाचा इशारा
जळगाव : जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडू आणि सकाळ-संध्याकाळ मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांकडून आकारण्यात येणारे शुल्क तात्काळ रद्द करून क्रीडा संकुल सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)तर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून दुरुस्तीच्या कामामुळे जिल्हा क्रीडा संकुल खेळाडू व नागरिकांसाठी बंद होते. गेल्या सहा महिन्यांपासून काम पूर्ण होऊनही संकुल सुरू करण्यात विलंब झाला. शहरातील विविध खेळाडू आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठपुराव्यानंतरच संकुल सुरू करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
शुल्क आकारणीला विरोध
संकुलाच्या देखभालीसाठी निधी नसल्याचे कारण देत वार्षिक ९ हजार ते ५६ हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच मॉर्निंग वॉक किंवा व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांकडून तासाला ५० रुपये आकारण्याचा प्रस्तावही अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.
भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी
क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी ५ ते ६ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा उल्लेख करत या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण कामाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनाचा इशारा
जिल्हा क्रीडा संकुलातील सर्व सुविधा शहरातील खेळाडू आणि नागरिकांना मोफत उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी, जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, युवक प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे, माजी नगरसेवक सुनिल भैय्या माळी, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष संजय जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळराव पाचवणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू व नागरिक उपस्थित होते.







