Other

जळगावात प्रभावी आणि सकारात्मकतेसाठी ‘सोशल मीडिया सुयोग्य वापर’ कार्यशाळा उत्साहात

जळगावात प्रभावी आणि सकारात्मकतेसाठी ‘सोशल मीडिया सुयोग्य वापर’ कार्यशाळा उत्साहात

जळगाव (प्रतिनिधी) : अजिंठा फिल्म सोसायटी, बालरंगभूमी परिषद (जळगाव), रिफ्लेक्शन फाउंडेशन संचलित पालक शाळा आणि डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सोशल मीडिया सुयोग्य वापर’ ही एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच बेंडाळे महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाली. डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा सकारात्मक आणि जबाबदारीने वापर कसा करावा, याचे महत्त्वपूर्ण धडे या कार्यशाळेत देण्यात आले.

कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सोशल मीडिया अभ्यासक तथा बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीचे प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे लाभले. कार्यशाळेच्या सुरुवातीला फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. नारखेडे यांचा, तर प्राचार्य डॉ. नारखेडे यांच्या हस्ते प्रमुख मार्गदर्शक योगेश शुक्ल यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सुचित्रा लोंढे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

या सोहळ्याचे औचित्य साधून अजिंठा फिल्म सोसायटी आणि बेंडाळे महाविद्यालय यांच्यात शैक्षणिक व सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. तसेच, नुकतीच Federation of Film Societies of India (Western Region) च्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल विनीत जोशी यांचा महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. नारखेडे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

आपल्या मनोगतात प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे यांनी सांगितले की, “आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा सुयोग्य व जबाबदारीने वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजप्रबोधन, जनजागृती आणि सकारात्मक विचारांच्या प्रसारासाठी सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे.” भविष्यात बेंडाळे महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठीही अशीच स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मार्गदर्शनाच्या सत्रात योगेश शुक्ल यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सोशल मीडियाचा परस्परसंबंध सविस्तर उलगडून दाखवला. ते म्हणाले की, आतापर्यंत एआय क्षेत्रात बहुतांश काम इंग्रजीत झाले असून मराठी भाषेतील सामग्री (कंटेंट) अजूनही कमी आहे, ती वाढवणे गरजेचे आहे. या वेळी त्यांनी विविध एआय आधारित ॲप्स आणि कंटेंट निर्मितीच्या आधुनिक साधनांची माहिती दिली. सोशल मीडियाचे अल्गोरिदम कसे काम करते आणि आपली पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचते, याचे गणित त्यांनी मांडले. पोस्ट किंवा व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी हॅशटॅगचा प्रभावी वापर कसा करावा आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी व्हिडिओ कंटेंट कसा असावा, यावर मार्गदर्शन केले. सोशल मीडिया खाती सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले.

कार्यशाळेच्या अंतिम सत्रात सहभागी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष एआय (AI) टूल्सचा वापर करून व्हिडिओ तयार केले. केवळ सैद्धांतिक माहिती न देता प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळाल्याने उपस्थितांचा उत्साह द्विगुणित झाला होता. या कार्यशाळेत अजिंठा फिल्म सोसायटी, देवगिरी चित्र साधना, रिफ्लेक्शन फाउंडेशन, बालरंगभूमी परिषदेचे कार्यकर्ते तसेच मूळजी जेठा महाविद्यालय आणि जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.

चित्रसाधनाचे प्रांत संयोजक किरण सोहळे यांनी आगामी उपक्रमांचे नियोजन सर्वांसमोर मांडले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा उपाध्ये यांनी केले, तर आभार प्रदर्शन कार्यशाळा प्रमुख डॉ. सचिन कुंभार यांनी केले. या प्रसंगी फिल्म सोसायटीचे उपाध्यक्ष अनिल भोळे, डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. श्रद्धा शुक्ल, पियुषभाई रावळ, चित्रसाधना सहसंयोजक डॉ. सुचित्रा लोंढे, ॲड. अनघा गोडबोले, पार्थ ठाकर, विभाग संयोजक प्रा. कमलाकर रुगे, संतोष सोनवणे, प्रा. पुरुषोत्तम महाजन यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button