जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत श्रीराम विद्यालयाच्या मुलींच्या संघाला प्रथम क्रमांक


जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत श्रीराम विद्यालयाच्या मुलींच्या संघाला प्रथम क्रमांक
१४ वर्षांखालील मुलींची विभागीय स्पर्धेसाठी निवड; मुलांच्या संघाने पटकावला द्वितीय क्रमांक
जळगाव, प्रतिनिधी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या विजेत्या संघाची पुढील विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघानेही दमदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळविला.
या उल्लेखनीय यशाबद्दल श्रीराम माध्यमिक विद्यालयात विजेत्या दोन्ही संघांचा तसेच संघाला मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका सौ. सरस्वती पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री. पन्नालाल वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष तथा संस्थेचे सचिव श्री. अशोक लाडवंजारी आणि संचालक श्री. भगवान लाडवंजारी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव तथा महानगर जिल्हाध्यक्ष श्री. अशोक भाऊ लाडवंजारी यांनी विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या मुलींच्या संघातील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आगामी स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पाटील सर यांनी केले. सत्कार समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.







