Other

आतड्याला बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

आतड्याला बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

अचूक निदान व तत्पर शस्त्रक्रियेमुळे मोठा धोका टळला

जळगाव (प्रतिनिधी) : तीव्र पोटदुखी, पोट फुगणे आणि अनेक दिवस शौचास न होणे अशा गंभीर लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या ७८ वर्षीय वृद्धाचे प्राण डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातील शल्यचिकित्सकांच्या तत्परतेमुळे वाचले. मोठ्या आतड्याला बसलेला धोकादायक पीळ (सिग्मॉइड व्हॉल्व्युलस) वेळेत ओळखून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याने रुग्णाला नवजीवन मिळाले.

मलकापूर येथील रहिवासी लक्ष्मण पाटील (वय ७८) यांना काही दिवसांपासून तीव्र पोटदुखीचा त्रास होत होता. कालांतराने त्यांचे पोट मोठ्या प्रमाणात फुगले तसेच शौचास होणे पूर्णपणे बंद झाले. प्रकृती गंभीर होत असल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले.

रुग्णाची तपासणी केल्यानंतर शल्यचिकित्सक डॉ. चैतन्य पाटील यांनी तातडीने सीटी स्कॅन करण्याचा निर्णय घेतला. तपासणीत मोठ्या आतड्याच्या सिग्मॉइड भागाला पीळ बसल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय भाषेत या स्थितीला सिग्मॉइड व्हॉल्व्युलस असे म्हणतात.

या आजारात आतडे स्वतःभोवती वळल्याने अन्न, वायू आणि मल यांचा मार्ग पूर्णपणे बंद होतो. उपचारास विलंब झाल्यास आतड्याचा रक्तपुरवठा खंडित होऊन आतडे निकामी होण्याचा तसेच रुग्णाच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

निदान होताच डॉ. चैतन्य पाटील, डॉ. प्रज्योत कदम आणि डॉ. आदित्य पाटील यांच्या शल्यचिकित्सकांच्या पथकाने तातडीने शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेदरम्यान आतड्याला बसलेला पीळ यशस्वीरित्या सोडविण्यात आला आणि आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारली असून ते सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

कोट…

“सिग्मॉइड व्हॉल्व्युलस ही विशेषतः वृद्धांमध्ये आढळणारी गंभीर समस्या आहे. पोटदुखी, पोट फुगणे, उलट्या होणे किंवा शौचास न होणे अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. वेळेत सीटी स्कॅनसारख्या तपासण्या केल्यास अचूक निदान होते आणि योग्य वेळी उपचार केल्यास जीवितहानी टाळता येते. या रुग्णाच्या बाबतीतही वेळेत निदान झाल्यामुळे यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचविणे शक्य झाले.”

– डॉ. प्रज्योत कदम, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालय

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button