OtherSocial

पितृपक्षात अंगारकी चतुर्थी : मंगळ ग्रह मंदिरात भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा

पितरांचे स्मरण आणि देवदर्शन परस्परविरोधी नाही; गैरसमज टाळण्याचे आवाहन

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । यंदा २९ सप्टेंबर रोजी अंगारकी चतुर्थी असून ही तिथी पितृपक्षाच्या कालावधीत येत असल्याने काही भाविकांमध्ये मंदिरात जावे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, पितृपक्ष सुरू असल्यामुळे देवदर्शन करू नये, असा सार्वत्रिक धार्मिक नियम नाही. त्यामुळे गैरसमजामुळे भाविकांनी अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिरातील दर्शन टाळू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांचे स्मरण, कृतज्ञता व्यक्त करणे तसेच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धेने धार्मिक विधी करण्याचा काळ मानला जातो. तर अंगारकी चतुर्थी ही गणेशभक्तांसाठी विशेष श्रद्धेची तिथी आहे. पितरांचे स्मरण करणे आणि देवदर्शन घेणे या स्वतंत्र धार्मिक आस्था असून, त्यांच्यात अनिवार्य विरोधाभास मानला जात नाही.

अमळनेरचे श्री मंगळ ग्रह मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून प्रत्येक अंगारकी चतुर्थीला येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. यंदा अंगारकी चतुर्थी पितृपक्षात येत असल्याने काही रूढ समजुतींमुळे भाविकांनी मंदिरात जाणे टाळू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या नावाने दान, अन्नदान किंवा धार्मिक विधी करणे आणि त्यानंतर किंवा त्याच काळात मंदिरात जाऊन देवदर्शन घेणे, हे परस्परविरोधी असल्याचे सर्वमान्य धार्मिक बंधन नाही. प्रत्येक कुटुंबाच्या परंपरा आणि श्रद्धांचा आदर राखून भाविकांनी आपापल्या श्रद्धेनुसार धार्मिक आचरण करावे, असेही सांगण्यात आले आहे.

“पितरांचे स्मरण करूया, देवाचे दर्शन घेऊया आणि श्रद्धेला विवेकाची जोड देऊया,” असा संदेश यानिमित्ताने देण्यात येत आहे.

दरम्यान, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी श्री मंगळ ग्रह मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून दर्शन व्यवस्था, शिस्त आणि भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. भाविकांनी मंदिर परिसरात शांतता, संयम आणि शिस्त पाळून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button