Special

Exclusive : दिव्याखाली अंधार.. मुदत संपलेल्या वाहनातून मोटार वाहन निरीक्षकांसमोर ‘टेस्ट ड्राईव्ह’

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । नियमांचा डोस पाजत जिल्हाभर वाहन चालकांना दंड देणाऱ्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातच दिव्याखाली अंधार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोहाडी येथील मैदानावर वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी चाचणी घेतलीजात असलेले वाहनच मुदत बाह्य असल्याचा धक्कादायक प्रकार महा पोलीस न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे मोटार वाहन निरीक्षकांच्या समोर हा प्रकार होत असल्याने काहीतरी झोल असल्याचे लक्षात येते.

जळगाव जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयातील गलथान कारभार आणि भ्रष्टाचाराबाबत नेहमीच आरडाओरड होत असते. काही दिवसांपूर्वीच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि एका खाजगी पंटरला ३ लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. सध्या धुळे येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांच्याकडे प्रभारी म्हणून पदभार सोपवण्यात आला आहे.

मुदत बाह्य वाहनातून टेस्ट ड्राईव्ह
नवीन वाहन चालक परवाना काढण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी मोहाडी शिवारातील मैदानावर चाचणी घेतली जाते. महा पोलीस न्यूजकडून ट्रॅकला भेट देण्यात आली असता एका प्रशिक्षण संस्थेच्या फिटनेस मुदत संपलेल्या वाहनातून टेस्ट ड्राईव्ह घेण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे कडक शिस्तीचा देखावा करणाऱ्या मोटार वाहन निरीक्षकांच्या समोरच हे सुरू असल्याने काहीतरी गोलमाल असल्याचे दिसून येते.

इन्शुरन्स, पीयुसी नसताना पासींग नूतनीकरण कसे?
महा पोलीस न्यूजच्या पाहणीत दि.७ जानेवारी २०२५ रोजी मोहाडी ट्रॅकवर चारचाकी क्रमांक एमएच.१९.क्यू.९६३५ सागर मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनातून टेस्ट ड्राईव्ह घेण्यात येत होती. ऑनलाईन माहिती घेतली असता वाहनाची फिटनेस पासिंग मुदत २२ ऑक्टोबर २०२४ रोजीच संपल्याचे निदर्शनास आले. दि.१६ जानेवारी २०२५ रोजी पुन्हा ऑनलाईन माहिती घेतली असता वाहनाची फिटनेस पासिंग मुदत ५ वर्षांसाठी वाढवण्यात आल्याचे समजले. मुळात वाहनाचा विमा (इन्शुरन्स) आणि पीयूसी मुदत संपलेली असताना देखील फिटनेस पासिंग नूतनीकरण झालेच कसे हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
वाहन फिटनेस पासिंग संपलेल्या वाहनातून टेस्ट ड्राईव्ह घेणे. अधिकाऱ्यांच्या समक्ष हा प्रकार होत असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करणे ही गंभीर बाब आहे. तसेच वाहनाचा विमा (इन्शुरन्स) आणि पीयूसी मुदत संपलेली असताना देखील वाहनाचे नूतनीकरण करून देणे हे देखील नियमबाह्य आहे. अनधिकृत कामांना खतपाणी घालणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button