Other

गरजवंतांची दिवाळी गोड करण्यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद

धुळे जिल्ह्यातील लोटन पाटील व त्यांच्या मातोश्रींकडून दिवाळी फराळ सुपूर्द; सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

गरजवंतांची दिवाळी गोड करण्यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद

धुळे जिल्ह्यातील लोटन पाटील व त्यांच्या मातोश्रींकडून दिवाळी फराळ सुपूर्द; सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

अमळनेर, प्रतिनिधी : राज्यात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गरजू कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेने ‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया… त्यांचे घरही आनंदाने प्रकाशमान करूया!’ असे भावनिक आवाहन केले आहे. या उपक्रमाला ३ नोव्हेंबरपासून सकारात्मक प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे.

धुळे जिल्ह्यातील काळखेडे येथील मूळ रहिवासी आणि सध्या धुळे येथील वाडीभोकर रोडवर डिजिटल मार्केटिंग व डिझायनिंगचा व्यवसाय करणारे लोटन शरद पाटील (कचवे) आणि त्यांच्या मातोश्री मथुराबाई पाटील यांनी स्वखर्चाने दिवाळी फराळ आणून मंगळग्रह सेवा संस्थेच्या विश्वस्तांकडे सुपूर्द केला. त्यांच्या या सेवाभावी कृतीतून माणुसकीचा दिवा प्रज्वलित झाला आहे.

लोटन पाटील यांनी ३ नोव्हेंबर रोजी वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या संस्थेच्या आवाहनाचे पत्रक वाचले. त्यानंतर त्यांनी आपल्या मातोश्रींसह दिवाळी फराळ घेऊन श्री मंगळग्रह मंदिर गाठले. मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव आणि डी. ए. सोनवणे यांनी हा फराळ स्वीकारला. यावेळी पाटील मायलेकांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

मंगळग्रह सेवा संस्थेने गरजवंतांची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळी फराळ, नवीन किंवा सुस्थितीतील कपडे, अन्नधान्य, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तू मदतरूपाने देण्याचे आवाहन केले आहे. इच्छुकांनी या वस्तू श्री मंगळग्रह मंदिरात आणून द्याव्यात किंवा स्वतः गरजूंपर्यंत पोहोचून त्यांचे वाटप करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचे पत्रक अमळनेरसह जळगाव आणि धुळे जिल्ह्यांत वितरित करण्यात आले. त्यानंतर दिवसभर अनेकांनी दूरध्वनीद्वारे या उपक्रमाचे कौतुक केले. मंदिर व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या संस्थेने गरजवंतांच्या आनंदासाठी पुढाकार घेणे ही अभिनंदनीय आणि अनुकरणीय बाब असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. तसेच दिवाळी फराळासह इतर जीवनावश्यक वस्तू देण्याची तयारीही दर्शविली.

काही नागरिक मंदिरात वस्तू आणून देणार असून, काही जण विविध भागांत जाऊन स्वतः गरजूंना मदत करणार आहेत. या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहता सामाजिक बांधिलकीतून अनेक हात मदतीसाठी पुढे येत असल्याचे चित्र आहे. लोटन पाटील आणि त्यांच्या मातोश्रींनी केलेली मदत या सेवाभावी उपक्रमातील पहिला प्रेरणादायी प्रतिसाद ठरली आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button