Other

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप

संजय पवार, अनिल पाटील, सुमित पाटील यांचे अर्ज अवैध

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप

संजय पवार, अनिल पाटील, सुमित पाटील यांचे अर्ज अवैध

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मैदानातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या कठोर निर्णयामुळे दिग्गजांना मोठा धक्का बसला आहे. दाखल झालेल्या एकूण ४०२ अर्जांपैकी तब्बल ९३ अर्ज अवैध ठरवण्यात आले असून, यामध्ये जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष संजय पवार आमदार अनिल पाटील आणि आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. या धक्क्यामुळे सहकार आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उमेदवारी अर्जावर दाखल करण्यात आलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली असून, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रमुख नेत्यांचे अर्ज अवैध; सहकार वर्तुळात चलबिचल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज आले होते. छाननी प्रक्रियेनंतर तब्बल ९३ अर्ज बाद झाल्याने अनेक दिग्गजांचे धाबे दणाणले आहेत.

संजय पवार व अनिल पाटील झटका

बँकेचे विद्यमान अध्यक्ष संजय पवार आणि आमदार अनिल पाटील हे गेल्या सलग दहा वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, छाननीत त्यांचेच अर्ज अवैध ठरल्याने त्यांच्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सुमित पाटील यांचा अर्जही बाद

पाचोरा तालुक्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा संस्था मतदारसंघातून आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या पात्रतेवर आक्षेप घेत सतीश परशुराम शिंदे यांनी हरकत घेतली होती. छाननीदरम्यान हा आक्षेप ग्राह्य धरत त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला.

 

रक्षा खडसे यांना दिलासा

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या जिल्हा बँकेच्या थकबाकीदार असल्याचा आक्षेप घेत त्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आली होती. यामुळे त्यांचा अर्ज रद्द होणार का, याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी दोन्ही बाजूंची सुनावणी घेतल्यानंतर रक्षा खडसे यांच्याविरोधातील हरकत अधिकृतपणे फेटाळून लावली. परिणामी, त्यांचा अर्ज कायम राहिला असून निवडणुकीच्या रिंगणात टिकून राहण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता लक्ष अपीलाच्या प्रक्रियेवर

छाननीत उमेदवारी अर्ज अवैध ठरलेल्या उमेदवारांना कायदेशीर लढा देण्याची संधी अद्याप उपलब्ध आहे. संबंधित बाद झालेल्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात पुढील तीन दिवसांच्या आत नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल करता येणार आहे.

आता संजय पवार, आमदार अनिल पाटील आणि सुमित पाटील यांच्यासह इतर बाद झालेले नेते अपीलाचा मार्ग स्वीकारतात का आणि अपीलात त्यांना दिलासा मिळतो का, यावरच त्यांच्या निवडणुकीतील भवितव्य अवलंबून राहणार आहे. या घडामोडींमुळे जळगाव जिल्हा बँकेचे राजकारण चांगलेच तापले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button