
राज्यस्तरीय पीक स्पर्धेत भडगावच्या संजय पाटील यांनी पटकावला राज्यात पहिला क्रमांक!
ज्वारी उत्पादनात हेक्टरी १०२.२५ क्विंटलचा विक्रम; ‘एडवंटा’च्या पीएसी ५३७ व्हर्टेक्स वाणाची कमाल
भडगाव (प्रतिनिधी):कृषी विभागामार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पीक स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये भडगाव तालुक्यातील मांडकी येथील प्रगतशील शेतकरी संजय पुंडलिक पाटील यांनी ज्वारी उत्पादनात संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांनी ज्वारीच्या सर्वसाधारण गटात हेक्टरी तब्बल १०२.२५ क्विंटल इतके विक्रमी उत्पादन घेत भडगाव तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा नावलौकिक राज्यात उंचावला आहे.
गेल्या वर्षाच्या रब्बी हंगामात कृषी विभागाकडून ही पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संजय पाटील यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
खते आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन ठरले महत्त्वाचे
आपल्या या यशाविषयी बोलताना शेतकरी संजय पाटील यांनी सांगितले की, त्यांनी रब्बी हंगामात ‘एडवंटा’ (Advanta) कंपनीच्या ‘पीएसी ५३७ व्हर्टेक्स’ (PAC 537 Vertex) या ज्वारीच्या वाणाची लागवड केली होती. योग्य वेळी दर्जेदार बियाणांची निवड, खतांचा संतुलित वापर आणि पाण्याचे अचूक व्यवस्थापन यामुळेच हे विक्रमी उत्पादन घेणे शक्य झाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
एडवंटा कंपनीतर्फे गौरव
शेतकरी संजय पाटील यांनी मिळवलेल्या या ऐतिहासिक यशामुळे एडवंटा कंपनीच्या वतीने मांडकी येथे त्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी एडवंटा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक (Divisional Manager) भूषण पाटील, कंपनी प्रतिनिधी अनिल पाटील यांच्यासह गावचे पोलीस पाटील आणि परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय पाटील यांच्या या यशामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही आधुनिक पद्धतीने शेती करण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे






