Crime

धुळ्यात बनावट विदेशी दारूचा तब्बल ७२.८८ लाखांचा साठा जप्त

लघडवाळ येथे स्थानिक गुन्हे शाखा व साक्री पोलिसांची संयुक्त कारवाई; ६२.८८ लाखांची बनावट दारू आणि टाटा टर्बो वाहन हस्तगत

धुळ्यात बनावट विदेशी दारूचा तब्बल ७२.८८ लाखांचा साठा जप्त

लघडवाळ येथे स्थानिक गुन्हे शाखा व साक्री पोलिसांची संयुक्त कारवाई; ६२.८८ लाखांची बनावट दारू आणि टाटा टर्बो वाहन हस्तगत

धुळे | प्रतिनिधी : मानवी जीवितास अपायकारक ठरू शकणाऱ्या बनावट विदेशी दारूच्या अवैध साठ्यावर धुळे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. साक्री तालुक्यातील लघडवाळ गावात घरासमोर उभ्या असलेल्या टाटा टर्बो वाहनातून तब्बल ६२ लाख ८८ हजार रुपये किमतीची बनावट विदेशी दारू जप्त करण्यात आली. दारू वाहतुकीसाठी वापरलेले सुमारे १० लाख रुपये किमतीचे वाहनही पोलिसांनी जप्त केले असून, एकूण ७२ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीवरून छापा

पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी बनावट दारू तयार करणारे अवैध कारखाने तसेच त्याची वाहतूक व विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्या अनुषंगाने दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना गोपनीय माहिती मिळाली. साक्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लघडवाळ गावात एका घरासमोर लाल रंगाच्या टाटा टर्बो वाहन क्रमांक MH-08-H-2109 मध्ये बनावट विदेशी दारू विक्रीच्या उद्देशाने लपवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

६५५ बॉक्समध्ये ३१ हजारांहून अधिक बाटल्या

माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि साक्री पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये Royal Blue Malt Whisky नावाने भरलेल्या १८० मिलीच्या बनावट दारूच्या बाटल्या आढळून आल्या.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत ६५५ खोके जप्त करण्यात आले. प्रत्येक खोक्यात ४८ सिलबंद बाटल्या असून, एका बाटलीची किंमत २०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या बनावट दारूची एकूण किंमत ६२ लाख ८८ हजार रुपये आहे.

विशेष म्हणजे या बाटल्यांवर बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग नंबर आणि विक्री किंमत नसल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले.

वाहनासह ७२.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त

बनावट दारू वाहतूक व साठवणुकीसाठी वापरण्यात आलेले टाटा टर्बो चारचाकी वाहन (MH-08-H-2109), किंमत सुमारे १० लाख रुपये, हेही पोलिसांनी जप्त केले आहे. त्यामुळे या कारवाईत जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ७२ लाख ८८ हजार रुपये इतकी आहे.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी राकेश धनलाल भोये (वय २६, रा. धनकवडी, पारगाव, ता. साक्री, जि. धुळे) याच्याविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५०/२०२६, बीएनएस कलम १२३, ३३६ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ), (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट दारूमुळे मानवी आरोग्य आणि जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही पोलीस तपास सुरू आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक ढोके, पोलीस उपनिरीक्षक अशोक वळवी तसेच पोलीस अंमलदार तुषार सूर्यवंशी, पंकज खैरमोडे, राजीव गिते, सुशिल शेंडे, संजय शिरसाठ, शांतीलाल पाटील, दिनेश मावची, रोशन चित्ते, तुषार जाधव, विकास शिरसाठ आणि नारायण चव्हाण यांनी कारवाईत सहभाग घेतला.

माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन

मानवी जीवितास अपायकारक व घातक बनावट दारू तयार करणे, साठवणे अथवा विक्री करणे हा गंभीर अपराध आहे. अशा प्रकारच्या अवैध दारू निर्मिती किंवा विक्रीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव व संपर्क क्रमांक पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी आपत्कालीन सेवा ११२ किंवा धुळे पोलीस नियंत्रण कक्षाच्या ०२५६२-२८८२११ / २८८२१२ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button