

मोटार विकायला निघाले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले!
चोरीचा काही दिवसांतच छडा; चौघांकडून मोटार पंप जप्त, रावेर पोलिसांची कारवाई
रावेर, प्रतिनिधी : शेतातून पाण्याची विद्युत मोटार चोरी करून ती विक्रीसाठी ग्राहकाच्या शोधात असलेल्या चौघांना रावेर पोलिसांनी अटक केली आहे. रमजीपूर येथील शेतातून चोरीला गेलेली ५ एच.पी. क्षमतेची समूराई कंपनीची मोटार पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केली. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईमुळे शेतातील विद्युत मोटार चोरीच्या प्रकरणाचा काही दिवसांतच छडा लागला.
रमजीपूर येथील शेतकरी मोहन लालचंद कावडकर यांच्या शेतातून ३ ऑक्टोबरच्या रात्री ५ एच.पी.ची पाण्याची विद्युत मोटार चोरीस गेली होती. याप्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी त्यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाला सुरुवात केली.
गावातील हालचालींवर पोलिसांची नजर
मोटार चोरीचा तपास सुरू असतानाच पोलिसांना रमजीपूर परिसरातील काही संशयित व्यक्ती चोरीची मोटार विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी माहितीची खातरजमा करून संबंधित ठिकाणी सापळा रचला. यावेळी राजेंद्र सुधाकर महाजन (३०), उमेश प्रकाश धनगर (२३), रितेश जगन्नाथ कावडकर (२३) आणि आनंदा गोपाळ धनगर (२८, सर्व रा. रमजीपूर, ता. रावेर) यांना ताब्यात घेण्यात आले.
चोरीचा मोटार पंप केला हस्तगत
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपींकडून चोरीच्या मोटारीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार लपवून ठेवलेला मोटार पंप पोलिसांनी हस्तगत केला. चौघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपासासाठी त्यांची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे.
आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
अटक करण्यात आलेल्या चौघांचा शेतातील मोटार चोरीच्या अन्य घटनांशी संबंध आहे का, तसेच या टोळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आरोपींकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास बीट अंमलदार सिकंदर तडवी करीत आहेत.
मोटार, कॉपर वायरच्या संशयास्पद व्यवहारांवर लक्ष
दरम्यान, ग्रामीण भागात विद्युत मोटार, पंप किंवा कॉपर वायरच्या चोरीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. जुनी मोटार, विद्युत पंप किंवा कॉपर वायरची संशयास्पद पद्धतीने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तींबाबत माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांना कळवावे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.
या कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अमूल बच्छाव, पोलीस हेड कॉन्स्टेबल सिकंदर तडवी, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी आणि विकार शेख यांनी सहभाग घेतला.







