
द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत साने गुरुजींची ७६ वी पुण्यतिथी साजरी
प्रतिमा पूजन व अभिवादन; ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ गीताने दिला मानवतेचा संदेश
अमळनेर | प्रतिनिधी
खान्देश शिक्षण मंडळ संचलित द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत भारताचे थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक आणि साहित्यिक साने गुरुजी यांच्या ७६ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शाळेत साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या त्यांच्या अजरामर गीतातून समाजाला दिलेल्या मानवता, प्रेम आणि बंधुभावाच्या संदेशाचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, पर्यवेक्षक एस. पी. वाघ, ज्येष्ठ शिक्षक के. आर. बाविस्कर, ज्येष्ठ लिपिक शामभाऊ पवार, शिक्षकेतर प्रतिनिधी मनुभाऊ दीक्षित, श्रीमती जे. एल. पाटील, राजेश बिऱ्हाडे तसेच प्रविण पुरकर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी साने गुरुजी यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थिनींना त्यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली तसेच प्रेम, समता आणि मानवतेचे मूल्य जोपासण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हे गीत सामूहिकरित्या सादर करून या महान स्वातंत्र्यसैनिकाला भावपूर्ण अभिवादन केले. साने गुरुजींचे विचार आजही समाजाला दिशा देणारे असून त्यांच्या कार्याचे स्मरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.






