जळगावात आढळली तीन नानेटी जातीचे साप ; नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडले!

जळगावात आढळली तीन नानेटी जातीचे साप ; नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडले
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात जोरदार पावसाचे आगमन झाल्यानंतर कानळदा रस्त्यावरील ओमसाई नगर परिसरातील एका घराच्या कंपाउंडबाहेरील फरशीखाली नानेटी जातीचे तीन साप आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या परिसरातील रहिवासी सुनील तांबे यांनी वन्यजीव संस्थेचे सर्पमित्र प्रदीप शेळके व अशोक खामकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर संस्थेचे सर्पमित्र हेमराज सपकाळे यांना तात्काळ घटनास्थळी पाठविण्यात आले. त्यांनी घटनास्थळी पोहोचून अत्यंत सावधगिरीने तीनही सापांचे सुरक्षित रेस्क्यू केले व त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
नानेटी हा बिनविषारी साप असून आपल्या भागात तो अत्यंत कमी प्रमाणात आढळतो. कोकणातील भातशेतीच्या परिसरात मात्र हा साप मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. लहान बेडकांची पिल्ले ही त्याची प्रमुख शिकार असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विषारी अथवा बिनविषारी साप आढळल्यास घाबरून न जाता किंवा त्यांना इजा न करता तात्काळ जवळच्या सर्पमित्राशी संपर्क साधावा, असे आवाहन वन्यजीव संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे तसेच सचिव योगेश गालफाडे यांनी केले आहे.






