जिल्हा रुग्णालयात नर्सचा विनयभंग; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

जिल्हा रुग्णालयात नर्सचा विनयभंग; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णाला भेटण्यासाठी आलेल्या गोलू वंजारी (रा. एरंडोल) या तरुणाने वार्डात ड्युटीवरील २३ वर्षीय नर्सच्या पाठीवर हात फिरवून तिचा विनयभंग केला. ही घटना १२ मे २०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. याप्रकरणी संशयिताने सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की आणि दमदाटी केली. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेली नर्स वार्डात स्टूलवर बसली असताना गोलू वंजारी हा त्याचा ओळखीचा संजय अनिल भोई (रा. एरंडोल) याला अपघातानंतर भेटण्यासाठी आला होता.
यावेळी त्याने नर्सच्या पाठीवर हात फिरवून लज्जास्पद कृत्य केले. नर्सने जाब विचारल्यावर संशयिताने “हात फिरवला तर काय झाले, माझे नाव गोलू वंजारी आहे, तू काय करायचे ते कर” अशी धमकी दिली.नर्सने हा प्रकार सुरक्षा रक्षकाला सांगितल्यावर संशयिताने रक्षकाला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि तेथून पळ काढला.
दोन दिवसांनंतर नर्सने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गोलू वंजारीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवला गेला आहे. तपास उपनिरीक्षक शांताराम देशमुख करत आहेत.