मुसळधार पावसात घर कोसळून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, एक जखमी

मुसळधार पावसात घर कोसळून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, एक जखमी
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील सततच्या मुसळधार पावसामुळे कृष्णापुरी परिसरातील टेकडीगल्लीत सोमवारी दुपारी मातीचे घर कोसळून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर दुसरा मुलगा जखमी झाला आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत मुलाचे नाव महेश नितिन राणे (वय १२, रा. लोंढे, ता. चाळीसगाव) असे असून तो आपल्या विधवा आईचा एकुलता एक मुलगा होता. शिक्षणासाठी तो पाचोर्यातील नातेवाईकांकडे राहत होता. दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारी महेश व त्याचा मावसभाऊ योगेश पाटील घराच्या मागील बाजूस विसावत असताना अचानक भिंत कोसळली. त्याखाली दबून दोघे गंभीर जखमी झाले.
स्थानिकांनी तातडीने ढिगारा हटवून दोघांना बाहेर काढले. ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महेशला मृत घोषित केले, तर योगेशवर उपचार सुरू आहेत. गेल्या वीस दिवसांपासूनच्या पावसामुळे भिंत व पाया ओलसर होऊनच ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
घटनेनंतर नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे, तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व कुटुंबीयांना धीर दिला. विधवा आईचा एकमेव आधार हरपल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.






