

तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
देवझिरी शिवारातील कारवाई; एमपी बॉर्डरजवळ गांजा पिकविणाऱ्या एकाला अटक
जळगाव, प्रतिनिधी : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवझिरी गावाजवळील शेतशिवारात तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी कारवाई करत गांजाची १७५ झाडे जप्त केली असून, याप्रकरणी देवसिंह बरेला याला ताब्यात घेतले आहे.
तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड
दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी डीवायएसपी सुनील पाटील आणि अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी एपीआय प्रशांत कंधारे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोपीने तुरीच्या पिकामध्ये गांजाची झाडे लावल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
एमपी बॉर्डरलगत कारवाई
देवझिरी गावातील संबंधित शेतशिवार हे मध्य प्रदेशाच्या सीमेलगत असल्याने या कारवाईला विशेष महत्त्व आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण १७५ गांजाची झाडे जप्त केली आहेत. पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, जप्त गांजाचे वजन व किंमत निश्चित करण्याची प्रक्रिया केली जात आहे.







