Detection Story : एमआयडीसी पोलिसांनी सोडले, एलसीबीने पकडले, मोलकरणीने दिली माहिती आणि उलगडला गुन्हा

महा पोलीस न्यूज ।चेतन वाणी । जळगाव शहरातील रणछोड नगरात दोन दिवसापूर्वी एका विवाहितेची घरात निर्घृणपणे हत्त्या करण्यात आली होती. जळगाव एलसीबीच्या पथकाने अवघ्या २० तासात कोणताही सबळ पुरावा नसताना गुन्ह्याचा उलगडा केला आहे. विशेष म्हणजे आरोपी लालबाबू उर्फ लाला रामनाथ पासवान वय-४३ रा.रामेश्वर कॉलनी याला एमआयडीसी पोलिसांनी चौकशी करून सोडून दिले होते त्यांनतर एलसीबीने त्याला ताब्यात घेतले होते. कोणताही ठोस पुरावा नसताना देखील पोलिसांनी शिताफीने गुन्हा उघड केला आहे.
जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिरामागील बाजूला असलेल्या गणेशवाडी रणछोड नगर परिसरात राहणारे राजेश नवाल यांचे दाणाबाजारात धान्याचे दुकान आहे. गुरुवार दि.१० ऑक्टोबर रोजी ते दुकानावर गेलेले होते. राजेश नवाल यांच्या पत्नी सुवर्णा नवाल वय-५७ या घरी एकट्याच होत्या. रात्री ९ वाजेच्या सुमारास राजेश नवाल हे घरी आले असता घरात पत्नी सुवर्णा या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्यांना दिसल्या. भरवस्तीत खून झाल्याने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला विचारला इतरांचा पत्ता
गुन्हा घडल्यानंतर प्राथमिक माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी लालबाबु रामनाथ पासवान, वय ४३, रा.सम्राट कॉलनी, जुना मेहरुण रोड याला ताब्यात घेतले. पोलिसांना त्याच्यावर संशयच आला नाही तर त्यांनी त्याच्याकडून इतरांचा पत्ता काढून घेतला. सुरुवातीला पोलिसांना इंगळे नामक तरुणावर संशय होता, त्यातच त्याचा मोबाईल बंद असल्याने त्याच्यावर संशय बळावला होता. उर्वरित तिघे तर अगोदरपासूनच पोलिसांच्या रडारवर होते.
एलसीबीने ताब्यात घेऊन केला उलगडा
मयत सुवर्णा नवाल यांचा खून होण्यापूर्वी घरकाम करणारी मोलकरीण कामे करून गेली होती. पोलीस चौकशीत काम करून जाताना एक पुरुष त्यांच्यासोबतघरात बसलेला असल्याचे तिने सांगितले. वर्णनावरून एलसीबीने लालबाबु रामनाथ पासवान याला ताब्यात घेतले. एलसीबीच्या दोन कर्मचाऱ्यांनी त्याला शब्दांच्या जाळ्यात अडकवले आणि त्यात तो गुंतला. खून केल्याची कबुली देत त्याने नाल्यात हातोडा फेकल्याचे देखील सांगितले. पहाटे ५ वाजेपर्यंत एलसीबी टीम त्याची चौकशी करीत होती. तत्पूर्वी पोलिसांनी लालाच्या पत्नीची चौकशी केली असता तिने देखील लालाकडे बोट दाखवले होते.
एका कर्मचाऱ्याने घेतला मयतेचा मोबाईल
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा ताफा पोहचला. प्रथमदर्शनी पाहणी केल्यावर खून असल्याचे निष्पन्न होताच पोलीस कामाला लागले. अधिक जलद गतीने तपास करण्याच्या प्रयत्नात एमआयडीसीच्या एका कर्मचाऱ्याने मयतेचा मोबाईल ताब्यात घेत काढता पाय घेतला. काही वेळाने वरिष्ठांच्या प्रकार लक्षात येताच त्यांनी त्या कर्मचाऱ्याला खडे बोल सुनावले.
..म्हणून ब्राउनी भुंकला नाही
नवाल कुटुंबातील सदस्य ब्राउनी नावाचा कुत्रा सतत अनोळखी व्यक्तींना पाहून भुंकत होता. लाला पासवानसह इतर दोघांचे सुवर्णा नवाल यांच्या घरी नेहमी येणे असल्याने ते ब्राउनी याच्या देखील परिचयाचे झाले होते. म्हणूनच ते घरी आल्यावर तो त्यांना बघून भुंकला नाही.
पैसे परत न देण्यासाठी काढला काटा
सुवर्णा नवाल या नेहमी पैसे उधार देत होत्या. लाला पासवान याची पत्नी वंदना अगोदर फायनान्स कंपनीत काम करीत असल्याने तिला याबाबत माहिती होती. सुवर्णा नवाल यांच्या संपर्कात आल्यावर तिने देखील त्यांच्याकडून पैसे घेतले होते. लालबाबु रामनाथ पासवान याने ६० हजार, सरला धर्मेंद्र चव्हाण हिने ३ लाख व राजेंद्र उर्फ आप्पा पाटील याला ८ लाख मिळणार होते. सुवर्णा नवाल यांनी त्यांचे स्त्रीधन त्यांच्याकडे देवून ते गहाण ठेवून पैसे दिले होते. सध्या दसरा, दिवाळी सण असल्याने पुजेसाठी त्यांचे स्त्रीधनचे सोने लागणार होते. म्हणुन त्या आरोपी लालबाबु यांची पत्नी वंदना, सरला चव्हाण व राजेंद्र उर्फ आप्पा पाटील यांना वारंवार फोन करून मागणी करीत होत्या.
बहिणाबाई उद्यानाजवळ शिजला कट
लालबाबु याची पत्नी वंदना ही त्याला सोडून दुसऱ्यासोबत राहत असल्याने त्या सुवर्णा नवाल यांचा फ़ोन घेत नव्हत्या. त्यामुळे त्या आरोपी लालबाबु पासवान यास तसेच सरला चव्हाण व राजेंद्र उर्फ आप्पा पाटील यांना वारंवार फोन करून पैश्याची मागणी करीत होत्या. पैशांच्या तगद्याला कंटाळून आरोपी लालबाबु पासवान, सरला चव्हाण व राजेंद्र उर्फ आप्पा पाटील यांनी एकत्रीत येवून दि.९ रोजी बहिणाबाई उद्यानाजवळ कट रचला. दि.१० रोजी तिघांनी मयत सुवर्णा नवाल यांना पैसे द्यायचे आहेत असा बहाणा करून त्यांचे घरी जावून त्या बसलेल्या असताना त्यांच्या डोक्यात वार करून त्यांना संपवले.
प्रसिद्धिसाठी माध्यमांना दिली माहिती
पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी हे पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण माहिती देणार होते. तत्पूर्वी नेहमीप्रमाणे काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी माध्यमांना माहिती पुरवली. आपल्याला हवी तशी माहिती आणि तपास पथकातील कर्मचाऱ्यांची अर्धवट नावे माध्यमांना पुरवली.