पाचोरा पोलिसांची धडक कारवाई, धारदार तलवारीसह तरुण ताब्यात
भडगाव रोडवरील साई मंदिराजवळ कारवाई; धारदार तलवार जप्त


महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । पाचोरा शहरातील भडगाव रोड परिसरात धारदार तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका तरुणाला ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव रोडवरील साई मंदिराजवळ, सुशील डेअरीसमोर एक इसम त्याच्या ताब्यात धारदार तलवार घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती पाचोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राहुल कुमार पवार यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, जितेश पाटील, पवन पाटील, संदीप राजपूत यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयित रोहित यशवंत पाटील (वय १९, रा. विवेकानंद नगर, पाचोरा) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून अंदाजे ३ हजार रुपये किमतीची स्टील पात्याची तलवार जप्त केली. सदर तलवारीची लांबी अंदाजे दीड फूट आहे.
या प्रकरणी पोहेकॉ संदीप राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहेत. पाचोरा पोलिसांच्या या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणी शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.







