SpecialCrimeSocial

ड्रग्सचा विळखा : जळगावात पोलीस अधिकाऱ्याचा बळी घेतला जातोय का?

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील ड्रग्स प्रकरण सध्या पुन्हा चर्चेत आलेले आहे. जळगाव शहर पोलिसांनी पकडलेल्या ड्रग्स प्रकरणात ड्रग्स विक्रेत्यासोबत संबंध असल्याचे कारण देत एका पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन करण्यात आले. सध्या हे प्रकरण इथेच थांबलेले नाही तर त्याला पुन्हा पुन्हा ऊत देण्याचा प्रयत्न होतोय. मीडिया ट्रायल करीत त्यात आग ओतली जात असून एखाद्याला आपल्या मार्गातून बाजूला सारण्यासाठी दुसरा पोलीस काय करू शकतो याचे हे जिवंत उदाहरण आहे. सध्याची परिस्थिती पाहता स्व.पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या प्रकरणाची पुन्हा आठवण होते.

जळगाव जिल्ह्याला ड्रग्सचा विळखा बसतोय हे सत्य नाकारण्यासारखे नक्कीच नाही. सुरुवातीला जळगाव शहरापुरते मर्यादित असलेले ड्रग्सचे लोण आता तालुक्यात देखील जाऊन पोहचले आहे. ड्रग्स विक्रेत्यांची मोठी साखळी तयार झाली असून त्यापैकी काही जणच अद्याप कोठडीत पोहचले आहे. ड्रग्सची पाळेमुळे शोधून सर्व प्रकरण तडीस नेण्यासाठी काही पोलीस प्रयत्न करीत असले तरी त्यासाठी एक व्यापक मोहीम राबविण्याची गरज आहे. जळगाव शहर पोलिसांनी तीन महिन्यांपूर्वी पकडलेल्या ड्रग्स प्रकरणाची सध्या जास्त चर्चा आहे.

गुरांची निर्दयीपणे वाहतूक केल्याच्या गुन्ह्यापासून आला संबंध
जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अबरार जिलानी नामक एका संशयिताचे नाव समोर येत आहे. अबरारसोबत आजवर ३६३ कॉल झाल्याचे कारण देत पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांचे निलंबन करण्यात आले आहे. आरोपाच्या मुळाशी गेले असता अबरारसोबत दत्तात्रय पोटे यांचा संपर्क होता हे खरे असले तरी त्यामागे गुन्हे हेच कारण आहे. पोटे एमआयडीसी पोलीस ठाण्यात असताना मार्च २०२४ मध्ये गुरांची निर्दयीपणे वाहतूक केल्याच्या गुन्ह्यात पोटे यांचा अबरार याच्याशी संपर्क आला होता. त्या गुन्ह्यात अबरार याच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याची चौकशी आणि आरोपीचे नातेवाईक असल्याने अबरार आणि पोटे यांचे फोनवरून बोलणे होते होते.

दत्तात्रय पोटेंच्या माध्यमातून ५८ गुन्ह्यात कारवाई
पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे संपर्कात असलेल्या अबरार याच्यावर आजवर एकही ड्रग्स विक्री, गांजा, अवैध दारू विक्रीचा गुन्हा नाही. अंमली पदार्थ विक्रीचा कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा नसलेल्या एखाद्यासोबत कोणताही अधिकारी आणि कर्मचारी सहज ओळख ठेवू शकतो. पहिल्या गुन्ह्याच्या माध्यमातून संपर्कात आल्यावर अबरार याचा आणि पोटे यांचा अनेकदा संपर्क झाला. अबरार याची दुचाकी चोरी होणे, एखाद्या गुन्ह्यात तो पंच असणे, दंगलीची माहिती देणे, गुन्हेगारांची माहिती देणे, शांतता समितीची बैठक, संशयितांची ओळख परेड, गुरांची अवैध वाहतूक होत असल्याची त्याची माहिती देण्यासाठी अबरार आणि पोटे यांचे अनेकदा फोनवरून बोलणे झाले आहे. अबरार याच्या माध्यमातून दत्तात्रय पोटे यांनी ५८ गुन्ह्यात कारवाई केलेली असून त्यापैकी २७ गुन्ह्यांशी त्याचा थेट संबंध आहे. एखाद्या खबरीसोबत पोलिसांचे बोलणे हे गुन्हा नव्हे हे यावरून प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे.

सर्वोच्च न्यायायालयात प्रकरण, भावाविरुद्ध दाखल केली चार्जशीट
अबरार कुरेशी आणि दत्तात्रय पोटे यांचे केवळ खबरी किंवा गुन्हयाशी संबंधीत व्यक्ती म्हणून असलेले संबंध होते हे यावरून समोर येते कि, मार्च २०२४ मध्ये एमआयडीसी पोलिसांनी पकडलेली गुरे पोलीस सोडत नसल्याने अबरारचा नातेवाईक असलेल्या फिर्यादीने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुरुवातीला जळगाव न्यायालयात आणि त्यानंतर खंडपीठात यावर कामकाज झाले होते. न्यायायालयाने गुन्ह्यात तपासाधिकारी दत्तात्रय पोटे यांना देखील विचारणा केली होती. अबरार याच्या नातेवाईकांच्या विरोधात असलेल्या तीन गुन्ह्यात पोटे यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये चार्जशीट देखील दाखल केले आहे.

एमआयडीसीला असताना होता संपर्क
पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात असताना विविध गुन्ह्याच्या माध्यमातून त्यांचा फोनवरून संपर्क झाला होता. २०२४ च्या अखेर पर्यंत पोटे हे अबरार याच्या संपर्कात होते मात्र त्यानंतर त्यांचा त्याच्याशी संपर्क आलेला नाही. विशेष म्हणजे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तेव्हा आणि त्यानंतर पोटे यांचा अबरार याच्याशी संपर्क झालेला नाही. तसेच यापूर्वी झालेल्या संभाषणाच्या ऑडीओ क्लिप देखील दत्तात्रय पोटे यांनी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी आणि चौकशी अधिकारी संदीप गावित यांना ऐकवल्या आहेत. कॉल रेकॉर्डिंगमध्ये काहीही आक्षेपार्ह आढळून आल्याचे सध्यातरी समोर आलेले नाही.

देशसेवेसाठी लावली आहे जीवाची बाजी
पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे महाराष्ट्र पोलीस दलात येण्यापूर्वी अगोदर भारतीय सैन्यदलात होते. देशाची सेवा करताना त्यांनी अतिरेक्यांशी देखील दोन हात केले आहे. भारतीय शासनाने पोटे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सर्वोच्च पदक देऊन देखील गौरविलेले आहे. जळगाव पोलीस दलातील सेवेत देखील आजवर त्यांच्यावर कोणतेही आरोप नाही आणि कोणतीही कारवाई झालेली नाही.

..तर पोलीस अधिकारी मोबाईलवरून संपर्क करेल का?
सध्या सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असते आणि जवळपास प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंग देखील असते. सर्वत्र धोकादायक परिस्थिती असताना एखाद्या आरोपीशी किंवा अवैध धंदे चालकाशी संपर्क करायचा झाल्यास पोलीस स्वतःच्या मोबाईलवरून करेल का? हा देखील एक मोठा प्रश्न आहे. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे तर अशी चूक करणे शक्यच नाही. कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी नियमबाह्य अथवा चुकीच्या कामासाठी संपर्क करायचा असल्यास साध्या कॉल ऐवजी व्हाट्सअँप कॉल किंवा इतर पद्धतीने संपर्क साधेल हे मात्र निश्चित आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button