Detection

हिमाचलमध्ये खून करून जात होते गोवा, जळगावात उतरले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

शनिपेठ पोलिसांची कामगिरी ; मोबाईल विक्री करताना चौघे ताब्यात

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । हिमाचल प्रदेशातील खून प्रकरणातील चार संशयीत आरोपी गोवा जाण्यासाठी मुंबईच्या दिशेने पलायन करत असताना जळगावात येऊन मोबाईल विकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी तातडीने कारवाई केली. हिमाचल प्रदेश पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शनिपेठ पोलिसांनी शोधमोहीम राबवत चारही संशयीत आरोपींना शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीत ताब्यात घेतले. या कारवाईमुळे हिमाचल प्रदेशातील खून प्रकरणातील आरोपींचा पलायनाचा प्रयत्न जळगावातच फसला.

हिमाचल प्रदेशातील मुकेश कुमार याचा दि.२९ सप्टेंबर रोजी खून केल्याप्रकरणी ३० सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मयत मुकेश कुमार आणि आरोपी एकत्र दारू पीत असताना त्यांच्यात वाद झाला. यावेळी मयताने आरोपींच्या बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर संतापाच्या भरात आरोपींनी मुकेश कुमार यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून केल्याची माहिती हिमाचल प्रदेश पोलिसांकडून देण्यात आली आहे.

खून केल्यानंतर मुंबईच्या दिशेने पलायन
घटनेनंतर आरोपी किसंपूर येथून सकाळी सुमारे ११ वाजता निघाले. त्यानंतर ते अंबाला येथे पोहोचले. तेथून दुपारी सुमारे ४.३० वाजता मुंबई एक्सप्रेसने मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. मुंबईहून गोवा जाण्याचा बेत होता मात्र प्रवासात पैसे संपले तसेच त्यांना भूक लागल्याने त्यांनी मोबाईल विकण्याचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. मोबाईल विकण्यासाठी ते जळगाव येथे उतरले. मात्र, जळगावात पाऊल ठेवताच हिमाचल प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे स्थानिक पोलिसांनी त्यांचा माग काढण्यास सुरुवात केली.

लोकेशन मिळताच शनिपेठ पोलिसांची शोधमोहीम
हिमाचल प्रदेश पोलिसांकडून चारही आरोपींचा सक्रियपणे शोध सुरू होता. आरोपींचे लोकेशन जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीत असल्याची माहिती हिमाचल प्रदेश पोलिसांनी शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना दिली. माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. आरोपींचे लोकेशन तसेच त्यांचे फोटो पोलिसांकडे असल्याने त्याआधारे परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली.

शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पथकासह संशयीत आरोपी

तीन वेळा हुलकावणी; चौथ्या प्रयत्नात पोलिसांच्या हाती
पोलिसांनी आरोपींचा माग काढताना तीन वेळा त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते परिसरात फिरत असल्याने प्रत्येक वेळी पोलिसांना हुलकावणी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी लोकेशन आणि उपलब्ध फोटोच्या आधारे अधिक बारकाईने शोध घेतला. अखेर चौथ्या प्रयत्नात पोलिसांना चारही आरोपींचा ठावठिकाणा मिळाला आणि अत्यंत शिताफीने कारवाई करत त्यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ विजय खैरे, पोहेकॉ योगेश जाधव, पोहेकॉ अनिल साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे, नवजीत चौधरी, अमोल वंजारी, पराग दुसाने आणि रवींद्र साबळे यांनी सहभाग घेतला.

ताब्यात घेतलेले चारही आरोपी बिहारमधील
पोलिसांनी चंदन कुमार – रा. कुतुबपूर, पोलीस ठाणे सकरा, जिल्हा मुझफ्फरपूर, बिहार, रोशन गोगल मुखिया – रा. कुतुबपूर, पोलीस ठाणे सकरा, जिल्हा मुझफ्फरपूर, बिहार, संतोष कुमार – रा. बरियारपूर, जिल्हा मुझफ्फरपूर, बिहार, अजित कुमार जोगा मेहतो – रा. पंडरक, जिल्हा पाटणा, बिहार यांना ताब्यात घेतले आहे.

हिमाचल पोलिसांचे पथक जळगावकडे रवाना
चारही संशयीत आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याबाबतची माहिती हिमाचल प्रदेश पोलिसांना देण्यात आली आहे. आरोपींना ताब्यात घेण्यासाठी हिमाचल प्रदेशातील संबंधित पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी जळगावकडे रवाना झाले आहेत. पुढील कायदेशीर कारवाई हिमाचल प्रदेश पोलिसांकडून करण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेशातील गंभीर खूनप्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि हिमाचल प्रदेश पोलिसांशी साधलेला समन्वय यामुळे चारही संशयित आरोपी जळगावातच पोलिसांच्या ताब्यात आले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button