OtherPolitics

जळगावकरांच्या गल्लीत राजुमामांचा प्रकाश, स्वखर्चाने बसवले १५० पथदिवे!

मनपाच्या दुरुस्तीला विलंब; गणेशोत्सवातील नागरिकांच्या तक्रारींची घेतली तातडीने दखल

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील अनेक भागांमध्ये पथदिवे बंद असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधारातून मार्गक्रमण करावे लागत आहे. महानगरपालिकेच्या नियमित यंत्रणेकडून पथदिव्यांची वेळेवर दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत असतानाच जळगाव शहराचे आमदार सुरेश (राजुमामा) भोळे यांनी नागरिकांच्या समस्येची तातडीने दखल घेत स्वखर्चाने शहरात १५० नवीन पथदिवे बसवून दिले आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील विविध भागांमध्ये पथदिवे बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. रात्रीच्या वेळी गणेश मंडळे, भाविक तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असताना काही रस्ते व परिसर अंधारात असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर आमदार राजुमामा भोळे यांनी मनपाच्या प्रक्रियेची वाट न पाहता नागरिकांच्या तातडीच्या गरजेचा विचार करून स्वखर्चाने १५० नवीन पथदिवे बसविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे ज्या भागात हे पथदिवे बसविण्यात आले आहेत, तेथील नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठा दिलासा मिळाला आहे.

मनपाच्या प्रक्रियेला आणखी १५ दिवस
शहरातील पथदिव्यांची दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी महानगरपालिकेने मक्तेदाराची नियुक्ती केलेली आहे. मात्र, संबंधित मक्तेदाराकडून वेळेवर दुरुस्ती होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी मक्तेदार नेमण्याची प्रक्रिया मनपा स्तरावर सुरू आहे. या प्रक्रियेला आणखी सुमारे १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रत्यक्ष दुरुस्तीची कामे सुरू झाल्यावर शहरातील सर्व पथदिवे दुरुस्त होण्यासाठी अंदाजे २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

नवरात्रोत्सवातही अंधाराचे सावट
गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात रात्री उशिरापर्यंत नागरिकांची, महिला व तरुणींची तसेच भाविकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. मात्र, मनपाची नवीन यंत्रणा कार्यान्वित होऊन संपूर्ण दुरुस्ती पूर्ण होण्यास २ ते ३ महिने लागण्याची शक्यता असल्याने काही भागांमध्ये आगामी नवरात्रोत्सवातही नागरिकांना अंधारमय रस्त्यांवरून मार्गक्रमण करावे लागू शकते.

अशा परिस्थितीत आमदार राजुमामा भोळे यांनी गणेशोत्सवात दाखविल्याप्रमाणे नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने उपाययोजना करण्याची भूमिका घेतली असून, उर्वरित अंधारमय भागांसाठीही तात्पुरत्या स्वरूपात पथदिव्यांची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.

नागरिकांच्या समस्येकडे तातडीने लक्ष
महानगरपालिकेची प्रक्रिया पूर्ण होऊन कायमस्वरूपी दुरुस्ती होण्यास काही महिने लागणार असताना आमदार राजुमामा भोळे यांनी स्वखर्चाने १५० पथदिवे बसवून नागरिकांच्या तातडीच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे. आता मनपा प्रशासनानेही मक्तेदाराची प्रक्रिया लवकर पूर्ण करून बंद पथदिव्यांची दुरुस्ती गतीने करणे अपेक्षित आहे. दरम्यान, या परिस्थितीत आमदार राजुमामा भोळे यांनी १५० पथदिवे स्वखर्चाने बसवून तातडीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असला, तरी शहरातील उर्वरित भागांमधील बंद पथदिव्यांसाठी मनपाच्या दुरुस्ती प्रक्रियेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शहरातील नागरिकांना सुरक्षित आणि प्रकाशमान रस्ते मिळावेत, यासाठी आमदार राजुमामा भोळे यांच्या पुढाकारानंतर मनपा प्रशासन उर्वरित पथदिव्यांच्या समस्येवर किती जलदगतीने उपाययोजना करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button