ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी


ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
इंग्रजी शब्दसामर्थ्याची जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात; १६ विद्यार्थ्यांचा गौरव
जळगाव, : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषा कौशल्य अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद, जळगाव आणि ओपन लिंक्स फाउंडेशन (विनोबा टीम) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा आज हॉटेल कमल पॅराडाईज, कालिंका माता मंदिराजवळ, भुसावळ रोड, जळगाव येथे उत्साहात पार पडली.
दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धांमधून निवड झालेले चार गटांतील विद्यार्थी जिल्हास्तरीय अंतिम फेरीत सहभागी झाले होते. स्पर्धेत इयत्ता १ली ते ८वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या इंग्रजी शब्दसामर्थ्याचे प्रदर्शन केले.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) निलेश पाटील, जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच ओपन लिंक्स फाउंडेशनच्या विनोबा टीमचे विभागीय प्रबंधक श्रीकांत सावंत व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. स्पर्धा इयत्ता १ली ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी चार गटांमध्ये घेण्यात आली. प्रत्येक स्पर्धकाला इंग्रजी शब्द देऊन त्याचे अचूक Spelling सांगण्यास सांगण्यात आले. बाद फेरी पद्धतीने प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि एक प्रोत्साहनपर असे एकूण चार विजेते निवडण्यात आले.
स्पर्धेतील विजेते
गट १ – इयत्ता १ली ते २री
प्रथम – संस्कार संजय तिकांडे, जि.प. शाळा, शिंदी, ता. चाळीसगाव
द्वितीय – तन्मय समाधान धनगर, जि.प. प्राथमिक शाळा, भराडी, ता. जामनेर
तृतीय – अंकित विलास सुरवाडे, जि.प. प्राथमिक शाळा, किनगाव बु., ता. यावल
प्रोत्साहनपर – विराट विकास गायकवाड, जि.प. प्राथमिक शाळा, एकुलती, ता. जामनेर
गट २ – इयत्ता ३री ते ४थी
प्रथम – मृगाक्षी हर्षल भोसले, जि.प. शाळा, लोंढे, ता. चाळीसगाव
द्वितीय – फैज इमरान खान कुरेशी, जि.प. प्राथमिक शाळा, ता. भडगाव
तृतीय – अंकिता रवींद्र पाटील, जि.प. शाळा, कुऱ्हेखु., ता. अमळनेर
प्रोत्साहनपर – असद अली सलमान अली, जि.प. उर्दू शाळा नं. २, ता. मुक्ताईनगर
गट ३ – इयत्ता ५वी ते ६वी
प्रथम – प्रिन्स गोकुळ चव्हाण, जि.प. प्राथमिक शाळा, बेलदारवाडी, ता. चाळीसगाव
द्वितीय – नशरा साई वसीम बागवान, जि.प. उर्दू कन्या शाळा, ता. बोदवड
तृतीय – अश्मीरा जहीर खान, जि.प. उर्दू कन्या शाळा नं. १, ता. भडगाव
प्रोत्साहनपर – चेतना किरण वागदरे, जि.प. शाळा, मुक्तळ, ता. बोदवड
गट ४ – इयत्ता ७वी ते ८वी
प्रथम – आयशा इम्रान खाटीक, जि.प. उर्दू शाळा, किनगाव, ता. यावल
द्वितीय – राजश्री प्रकाश नन्नवरे, जि.प. प्राथमिक शाळा, बांभोरी प्र. चा., ता. धरणगाव
तृतीय – शेख उमर शेख आरीफ, जि.प. उर्दू शाळा नं. २, ता. मुक्ताईनगर
प्रोत्साहनपर – भाग्यश्री प्रकाश धनगर, जि.प. प्राथमिक शाळा, खंडाळे, ता. भुसावळ.
सर्व १६ विजेत्या विद्यार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
इंग्रजी भाषेप्रती आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न
‘स्पेलिंग बी’ स्पर्धा ही केवळ इंग्रजी शब्दांचे अचूक Spelling सांगण्यापुरती मर्यादित नसून, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेप्रती आत्मविश्वास, अचूकता आणि शिकण्याची उत्सुकता निर्माण करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेच्या क्षमतेबाबत असलेल्या पारंपरिक समजुती बदलण्यासाठी अशा उपक्रमांची महत्त्वाची भूमिका आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देत त्यांच्या भाषिक कौशल्यांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
‘आदर्श (Aspirational) School’ घडविण्याच्या दिशेने टाकलेले हे एक ठोस पाऊल असून, यातून जिल्हा परिषदेचा बालककेंद्री (Child First) दृष्टिकोन अधोरेखित होत आहे.
शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या उपक्रमाला उपस्थित शिक्षक आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सहभागाचे कौतुक केले. तसेच स्पर्धेचे नियोजनबद्ध आयोजन आणि विद्यार्थ्यांना मिळालेल्या संधीबद्दल समाधान व्यक्त केले.
जिल्हा परिषद, जळगाव आणि ओपन लिंक्स फाउंडेशन (विनोबा टीम) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत आत्मविश्वासाने व्यक्त होण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.







