Other

जिल्हा परिषद सीईओ करिश्मा नायर यांची कानळदा येथील शाळा, अंगणवाडी व आरोग्य केंद्राला भेट

जिल्हा परिषद सीईओ करिश्मा नायर यांची कानळदा येथील शाळा, अंगणवाडी व आरोग्य केंद्राला भेट

रस्ता काँक्रिटीकरण कामाच्या गुणवत्तेबाबत तडजोड न करण्याच्या सूचना

जळगाव/प्रतिनिधी :- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद आस्थापनांना भेटी देण्याचा धडाका सुरू ठेवला आहे. बुधवार, दि. २४ जून रोजी त्यांनी जळगाव तालुक्यातील कानळदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली.

कानळदा येथे एकल महिलांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला. विद्यार्थ्यांना आद्याक्षरे वाचण्यास सांगून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेचा प्रत्यक्ष आढावा घेताना त्यांनी शिक्षकांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यापासून करिश्मा नायर यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायती व अंगणवाड्यांना भेटी देऊन तेथील सुविधा, सेवा व कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

यानंतर त्यांनी कानळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन स्वच्छता, औषधसाठा व उपलब्ध आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित असलेल्या आशा सेविकांशी त्यांनी संवाद साधून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबाबत चर्चा केली.

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी आव्हाने फाटा ते आव्हाने गावादरम्यान सुरू असलेल्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचीही पाहणी केली. रस्त्याच्या कामाची गुणवत्ता उत्तम राखावी व कामात कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

यावेळी जळगावचे गटविकास अधिकारी सी. ए. बोढरे, शाखा अभियंता सतीश शिसोदे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button