केंद्रीय मंत्र्यांच्या पेट्रोल पंपासह तीन ठिकाणी लुटमार करणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना अटक; मोठा शस्त्रसाठा जप्त

केंद्रीय मंत्र्यांच्या पेट्रोल पंपासह तीन ठिकाणी लुटमार करणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना अटक; मोठा शस्त्रसाठा जप्त
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! मुक्ताईनगरमधील तिहेरी दरोड्याचा चार दिवसांत छडा
मुक्ताईनगर / जळगाव: स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मुक्ताईनगर आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सशस्त्र दरोडेखोर टोळीचा अवघ्या चार दिवसांत पर्दाफाश केला आहे. ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर, तसेच कर्की फाटा आणि वरणगाव शिवारातील अन्य दोन पंपांवर टाकलेल्या तिहेरी दरोड्याप्रकरणी पाच सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एका अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
दरोडेखोरांनी एकूण तीन पेट्रोल पंपांना लक्ष्य केले होते. प्रत्येक ठिकाणी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आणि डेटा असलेला डीव्हीआर (DVR) चोरून नेला. तिन्ही ठिकाणाहून मिळून त्यांनी तब्बल १ लाख ३३ हजार रुपयांची रोकड लंपास केली होती.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत गोपनीय व तांत्रिक तपास केला. या पथकाने चार आरोपींना नाशिक येथून, तर उर्वरित एका आरोपीला आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला अकोला येथून अटक केली.
अटक केलेल्या आरोपींची नावे
सचिन अरविंद भालेराव (३५, भुसावळ)
पंकज मोहन गायकवाड (२३, भुसावळ)
हर्षल अनिल बावस्कर (२१, बाळापूर, अकोला)
देवेंद्र अनिल बावस्कर (२३, बाळापूर, अकोला)
प्रदुम्न दिनेश विरघट (१९, कौलखेड, अकोला)
पोलिसांनी आरोपींकडून ४० हजार रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. यासोबतच, टोळी वापरत असलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे, ज्यात तीन गावठी पिस्तुले, पाच मॅगझीन, नऊ मोबाईल फोन आणि गुन्ह्यांसाठी वापरलेली एक सॅक बॅग यांचा समावेश आहे.
मुख्य आरोपीवर गंभीर गुन्हे:
या टोळीचा म्होरक्या सचिन भालेराव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि दंगा यांसारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. तसेच, त्याला २०२४ मध्येच दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. हद्दपारीचा आदेश मोडत त्याने हा मोठा दरोडा टाकल्याचे उघड झाले आहे.






