Other

औषध निरीक्षक भरती पेपरफुटीवरून सरकारवर रोहिणी खडसे यांचा हल्लाबोल

औषध निरीक्षक भरती पेपरफुटीवरून सरकारवर रोहिणी खडसे यांचा हल्लाबोल

“विद्यार्थी आणि सरकार आमनेसामने आले तर शासनाला महाराष्ट्राचा धर्मेंद्र प्रधान ठरवावा लागेल”

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याच्या आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

रोहिणी खडसे म्हणाल्या की, देशभर गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर आता महाराष्ट्रातील भरती प्रक्रियेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच काही उमेदवारांपर्यंत पोहोचली का? मध्यस्थांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार झाले का? या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. जर हे आरोप खरे ठरले, तर हा लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर टाकलेला दरोडा असल्याचे त्यांनी म्हटले.

त्यांनी पुढे सांगितले की, राज्यातील एकामागोमाग एक भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. मेहनत करून अभ्यास करणारा विद्यार्थी आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, तर गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांना संधी मिळत असल्याची भावना तरुणांमध्ये निर्माण होत आहे.

या प्रकरणाची एसआयटी (SIT) किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच सीडीआर, आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि संबंधित सर्व बाबींची सखोल तपासणी करून दोषींना तातडीने शिक्षा करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सरकारला इशारा देताना रोहिणी खडसे म्हणाल्या, “वेळीच या प्रकरणाची दखल घेतली नाही, तर महाराष्ट्रातही जंतर-मंतरसारखे आंदोलन उभे राहू शकते. विद्यार्थी आणि सरकार आमनेसामने आले तर शासनाला ठरवावे लागेल की महाराष्ट्राचा धर्मेंद्र प्रधान कुणाला करायचे.”

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button