Detection

१ लाखाचे ५ लाख.. पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांनी एकाला गंडवले, एलसीबीने आवळल्या मुसक्या!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून तीन संशयीत आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या आरोपींपैकी एक जण पोलीस कर्मचारी असल्याचे समोर आले असून या घटनेने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ एप्रिल रोजी दुपारी एका फिर्यादी जगदीश शंकर व्यास रा.धानोरा ता.चोपडा यांना मोबाईलद्वारे मोठ्या रकमेच्या गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले. आरोपींनी विश्वास संपादन करून त्यांना जळगावातील एका हॉटेलमध्ये बोलावले. त्याठिकाणी फिर्यादीचा मुलगा पंकज याच्याकडून ५ लाख २० हजार रुपये घेतले आणि त्यानंतर त्याठिकाणी चेकिंग सुरू असल्याचे कारण देत ते फरार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एलसीबीचे पथक लागले कामाला
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस कर्मचारी प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, विजय पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, किशोर पाटील, राहुल रगडे, रविंद्र कापडणे, छगन तायडे, प्रविण हिवराळे तसेच तांत्रिक मदतीसाठी गौरव पाटील, मिलिंद जाधव, ईश्वर पाटील आणि प्रदीप सपकाळे यांचा समावेश होता.

सापळा रचून तिघांना घेतले ताब्यात
तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला. संशयित करमाडा जि.छत्रपती संभाजी येथे एका हॉटेलजवळ थांबले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपींमध्ये प्रकाश लक्ष्मण शिंदे (वय ४०), स्वप्नील दिलीप दळवी (वय ३३) आणि भागवत दत्ताराव कष्टे (वय ४०) सर्व रा.वाशीम यांचा समावेश आहे.

एक पोलीस कर्मचारी दुसऱ्यावर खुनाचा गुन्हा
तिघांपैकी भागवत कष्टे हा वाशीम जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयाचा पोलीस कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच स्वप्नील दिलीप दळवी याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली असून पुढील तपास शनीपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक साजीद मन्सुरी करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button