CrimeDetection

जळगाव पोलिसांचा गुन्हेगारीवर सर्वात मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’!

‘ऑपरेशन ड्रॉप केस’ने मुक्ताईनगरातील कुप्रसिद्ध टोळ्यांचे कंबरडे मोडले; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, सराईत आरोपी जेरबंद

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालत मुक्ताईनगर तालुक्यातील कुप्रसिद्ध गावांवर आज पहाटे इतिहासातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक यशस्वी समजले जाणारे ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ राबविले. अनेक वर्षांपासून देशभरातील नागरिकांची फसवणूक, लूटमार, दरोडे आणि विविध प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांसाठी बदनाम असलेल्या लालगोटा, हलखेडा, मधापुरी, जोंधनखेडा आणि चारठाणा या गावांवर पोलिसांनी एकाच वेळी धडक कारवाई करत गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

पहाटेच्या अंधारात शेकडो पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनी अत्यंत गोपनीय नियोजन करून गावांमध्ये प्रवेश केला. अनेक संशयितांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत शस्त्रे, जिवंत काडतुसे, रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल फोन, वाहने तसेच वन्यजीवांच्या कातड्यांसह मोठ्या प्रमाणात संशयास्पद मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

‘ड्रॉप केस’चा काळा व्यवसाय
मुक्ताईनगर तालुक्यातील ही गावे गेल्या अनेक वर्षांपासून ‘ड्रॉप केस’साठी कुप्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, सफेद बिबा, सुलेमानी पत्थर, सेकंड करन्सी, डबल इंजिन, जुने सोने, कॉपर यांसारख्या कथित दुर्मिळ वस्तूंचे व्हिडिओ व्हायरल करून देशभरातील लोकांना आमिष दाखविले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

मोठ्या नफ्याचे स्वप्न दाखवत पीडितांना गावात बोलावले जाते. त्यानंतर बनावट वस्तू दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. अनेकांना मारहाण करून पैसे लुटले जातात. काही प्रकरणांत तर पीडितांच्या जवळ हरणाचे किंवा वाघाचे कातडे ठेवून व्हिडिओ शूट केले जातात आणि “पोलिसांकडे गेलात तर वन्यजीव तस्करीच्या गुन्ह्यात अडकवू” अशी धमकी दिली जाते. पोलिसांच्या भाषेत या संपूर्ण प्रकाराला ‘ड्रॉप केस’ असे संबोधले जाते.

गुन्हेगारीचा भयंकर आलेख
मागील तीन वर्षांत या परिसरात दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यांची संख्या धक्कादायक आहे. त्यात दरोडा – १०, खुनासह दरोडा – १, खून – १, जबरी चोरी – ७, फसवणूक – १६, दरोड्याचा प्रयत्न – १, सरकारी नोकरावर हल्ला – २ असे गुन्हे दाखल आहेत. पोलिस अभिलेखानुसार या गावांमधील आरोपींची संख्या देखील मोठी आहे. त्यात हलखेडा पुरुष – ४३, महिला – २, माधापुरी, पुरुष – ५१, महिला – ११, लालगोटा पुरुष – ६१, महिला – १३, जोंधनखेडा पुरुष – १५, महिला – २, चारठाणा पुरुष – २० अशी आकडेवारी आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र आजच्या धडक कारवाईने गुन्हेगारांना स्पष्ट संदेश दिला आहे की, कायद्यापासून कोणीही सुटणार नाही.

शस्त्रे, रोकड आणि दागिन्यांचा मोठा साठा जप्त
कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन गावठी कट्टे, जिवंत काडतुसे, सुमारे २० लाख रुपयांची रोख रक्कम, अंदाजे ३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, ८ लाख रुपयांचे चांदीचे दागिने, ३० मोबाईल फोन, चार चारचाकी आणि सहा दुचाकी वाहने जप्त केली. याशिवाय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत एका आरोपीकडून हरण, कोल्हा आणि सशाचे कातडेही जप्त करण्यात आले आहे.

अनेक गुन्हे दाखल, आरोपी गजाआड
या कारवाईत शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, भारतीय न्याय संहिता तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फरेज राजु पवार, वय ४० वर्षे, रा. मधापुरी, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव, रामजाने राईसाहेब भोसले, वय ३२ वर्षे, रा. हलखेडा ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव, आक्काबाई जोगिंदर भोसले, वय ३२ वर्षे, रा. हलखेडा ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव, रोहित सुदेश पवार, वय ३२ वर्षे, रा. मधापुरी ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव, राजकिसन जोगिंदर भोसले, दया जोगिंदर भोसले, शिवकिसन जोगिंदर भोसले, आक्काबाई जोगिंदर भोसले, जोगिंदर राजवंती भोसले रा. हलखेडा ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव, गांझी दरियासिंग भोसले रा हलखेडा जुने ता.मुक्ताईनगर जि.जळगाव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच काही सराईत आणि पाहिजे असलेल्या आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.

२०० पोलिसांचे धाडसी ऑपरेशन
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी-अंमलदारांसह सुमारे २०० पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या ऑपरेशनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ केदार बारबोले, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, महेश गायकवाड, निलेश गायकवाड, राहुल वाघ, आशिष लव्हांगळे, विशाल पाटील, योगिता नारखेडे, मीरा देशमुख, अमित कुमार बागुल यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

गुन्हेगारीविरोधातील निर्णायक युद्ध
मुक्ताईनगर तालुक्यातील या कुप्रसिद्ध गावांवर पोलिसांनी केलेला हा सर्जिकल स्ट्राईक केवळ कारवाई नसून गुन्हेगारीविरोधातील निर्णायक युद्धाची सुरुवात मानली जात आहे. अनेक वर्षांपासून नागरिकांची फसवणूक करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यात जळगाव पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. ‘ऑपरेशन ड्रॉप केस’मुळे गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली असून सामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जळगाव पोलिसांनी दाखविलेली ही धाडसी आणि नियोजनबद्ध कामगिरी भविष्यातील अशा गुन्हेगारी टोळ्यांसाठी मोठा इशारा ठरणार आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button