Crime

महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । सोलर सिस्टीम बसवण्याची मंजुरी आणि रिलीज ऑर्डर देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. नितीन अभिमन्यु पाटील (वय ४९, पद- अतिरिक्त कार्यकारी अभियंता – वर्ग १, भुसावळ शहर १ महावितरण कार्यालय) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे महावितरण वर्तुळात आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये तीव्र खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे सोलर सिस्टीम बसवण्याची एजन्सी आहे. या एजन्सीअंतर्गत भुसावळ शहरातील दोन ग्राहकांनी सोलर सिस्टीम खरेदी केली होती. या दोन्ही ग्राहकांच्या सोलर सिस्टीमची ऑनलाइन मंजुरी व रिलीज ऑर्डर मिळण्यासाठी तक्रारदारांनी महावितरण कंपनीकडे अर्ज सादर केले होते. सदर प्रकरणांची तपासणी करून रिलीज ऑर्डर देण्याचे अधिकार अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांच्याकडे होते.

दीर्घकाळ मंजुरी व रिलीज ऑर्डर न मिळाल्याने तक्रारदार २२ जुलै रोजी भुसावळ येथील महावितरण कार्यालयात अभियंता नितीन पाटील यांना भेटण्यासाठी गेले. यावेळी पाटील यांनी प्रति प्रकरण १,००० रुपये याप्रमाणे दोन प्रकरणांच्या रिलीज ऑर्डरसाठी एकूण २,००० रुपयांच्या लाचेची थेट मागणी केली.

लाचलुचपत विभागाकडे तक्रार अन् सापळा
तक्रारदारांची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी लागलीच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), जळगाव येथे जाऊन अधिकृत तक्रार नोंदवली. तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने २२ जुलै रोजी पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. पडताळणीदरम्यान अधिकारी नितीन पाटील यांनी २,००० रुपयांची लाच मागितल्याचे आणि ती स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर एसीबीच्या पथकाने तात्काळ भुसावळ शहर १ महावितरण कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून २,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

कारवाई करणारे पथक
यशस्वी सापळा कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदिप मैराळे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. जळगाव योगेश ठाकूर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पो.उ.नि. सुरेश पाटील, महिला पो.हे.कॉ. संगीता पवार, पो.हे.कॉ. बाळू मराठे यांच्या पथकाने केली आहे.

नागरिकांना एसीबीचे आवाहन
शासकीय कामासाठी कोणत्याही लोकसेवकाने (शासकीय अधिकारी/कर्मचारी) लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीतर्फे करण्यात आले आहे. टोल फ्री क्रमांक: १०६४, जळगाव एसीबी व्हॉट्सॲप / संपर्क: ७५८८६६१०६४, दुरध्वनी क्रमांक: ०२५७-२२३५४७७, ई-मेल: dyspacbjalgaon@gmail.com / spacbnashik@mahapolice.gov.in असे आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button