Crime

BAMS प्रवेशाच्या नावाखाली तरुणाची ७ लाख २५ हजारांची फसवणूक; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

भारती विद्यापीठाच्या नावाने बनावट आयडी कार्ड व गुणपत्रिका ; चार लाखांचे धनादेशही वटले नाहीत

BAMS प्रवेशाच्या नावाखाली तरुणाची ७ लाख २५ हजारांची फसवणूक; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

भारती विद्यापीठाच्या नावाने बनावट आयडी कार्ड व गुणपत्रिका ; चार लाखांचे धनादेशही वटले नाहीत

जळगाव, प्रतिनिधी : BAMS (आयुर्वेद पदवी) अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्याकडून आठ लाख रुपये घेऊन भारती विद्यापीठाच्या नावाने बनावट आयडी कार्ड व गुणपत्रिका दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पैसे परत मागितल्यानंतर दिलेले प्रत्येकी दोन लाख रुपयांचे दोन धनादेशही वटले नाहीत. या प्रकरणी जळगाव शहरातील बुक बॉन्ड कॉलनी, रिंगरोड परिसरातील अभिज्योत करिअर फोरमच्या संचालिका मनीषा अजय जोशी आणि त्यांचे पती अजय जोशी यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणूक व बनावट कागदपत्रांप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहित रमेशराव येवले (वय ३०, रा. नशिराबाद) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, मोहित येवले यांना BAMS अभ्यासक्रमाचे शिक्षण घ्यायचे होते. मागील वर्षीच्या नीट परीक्षेत त्यांना १३० गुण मिळाले होते. प्रवेशासाठी माहिती घेत असताना त्यांना अभिज्योत करिअर फोरमबाबत समजले. त्यानुसार १४ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी संबंधित कार्यालयात जाऊन मनीषा जोशी व अजय जोशी यांची भेट घेतली. यावेळी डिम्ड विद्यापीठात BAMS प्रवेशासाठी १० ते २० लाख रुपये खर्च येईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर दहा लाख रुपयांपर्यंत प्रवेशाची व्यवस्था करून देण्याचे सांगण्यात आले.

२७ जानेवारी रोजी मोहित येवले यांनी मित्राकडून उसनवारीने घेतलेले तीन लाख रुपये आणि आवश्यक कागदपत्रे मनीषा जोशी यांच्याकडे दिली. त्यानंतर फेब्रुवारी व मार्च महिन्यात रोख तसेच ऑनलाइन पद्धतीने वेळोवेळी पैसे जमा केले. अशा प्रकारे एकूण आठ लाख रुपये दिले. यापैकी चार हप्त्यांसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या पावत्या देण्यात आल्या, तर उर्वरित सहा लाख रुपये डोनेशन असल्याने त्याची पावती मिळणार नसल्याचे सांगण्यात आले.

आयडी कार्ड व गुणपत्रिकेमुळे प्रकार उघड

१० मार्च २०२६ रोजी मोहित येवले यांची प्रवेश परीक्षेसाठी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर २५ जून रोजी त्यांना भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आयुर्वेद, पुणे या नावाचे आयडी कार्ड व्हॉट्सॲपवर पाठविण्यात आले. १९ ऑगस्ट रोजी गुणपत्रिकेची प्रतही पाठविण्यात आली. मात्र, गुणपत्रिकेवर ‘ट्राय सेमिस्टर’ असा उल्लेख असल्याने मोहित यांना संशय आला. त्यांनी याबाबत विचारणा केल्यानंतर २० ऑगस्ट रोजी ‘BAMS Year-1’ असा बदल करून दुसरी गुणपत्रिका पाठविण्यात आली.

आपली कोणतीही परीक्षा झालेली नसताना आयडी कार्ड आणि गुणपत्रिकेवरील तपशील संशयास्पद असल्याचे लक्षात आल्यानंतर मोहित येवले यांनी संबंधितांकडे पैसे परत मागण्यास सुरुवात केली.

दोन धनादेश वटले नाहीत

पैसे परत मागितल्यानंतर मनीषा जोशी यांनी ९ सप्टेंबर आणि ११ सप्टेंबर २०२६ रोजी प्रत्येकी दोन लाख रुपयांचे धनादेश दिले. मात्र, हे दोन्ही धनादेश वटले नाहीत. ऑनलाइन पद्धतीने केवळ ७५ हजार रुपये परत मिळाले असून, उर्वरित सात लाख २५ हजार रुपये मिळाले नसल्याचे मोहित येवले यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात २० ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा क्रमांक ३४२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३३६(३), ३३८, ३४०(२), ६१(२) आणि ३(५) अन्वये मनीषा अजय जोशी व अजय जोशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय भंडारकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button