Special

बीएचआर प्रकरण : गृहमंत्र्यांनी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाचे काय?

महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेत झालेल्या अपहार प्रकरणी नोव्हेंबर २०२० मध्ये पुणे येथे तीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. गुन्ह्यातील काही धक्कादायक माहितीच्या आधारे विधानसभा हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण हकीगत सांगत याप्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर महिनाभरात कारवाई करण्यात येईल असे जाहीर आश्वासन दिले होते. अधिवेशन आटोपून तीन महिने झाले तरी अद्याप कुणावरही कारवाई झाली नसल्याने गृहमंत्र्यांना कारवाईचा विसर पडला की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

राज्यभरात तीन वर्षापूर्वी बी.एच.आर.पतसंस्थेचा अपहार घोटाळा प्रचंड गाजला होता. अनेक नामी हस्ती आणि मातब्बर नेत्यांची नावे देखील या गुन्ह्यात समोर आली होती. बी.एच.आर. प्रकरण शांत झाले असे वाटत असताना नंतर त्यात अनेक धक्कादायक उलगडे झाले, विशेषतः पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले. बी.एच.आर.प्रकरणी नोव्हेंबर २०२० मध्ये पुणे येथे तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्ह्यातील तपासाच्या दृष्टीने काही धक्कादायक माहितीच्या आधारे हिवाळी अधिवेशनात एक लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती.

जळगांव येथील बी.एच.आर.या पतसंस्थेमध्ये नोव्हेंबर २०२० मध्ये पुणे येथे नोंद झालेल्या तिन्ही गुन्हयात फिर्यादी हजर नसतांना विस्मयकारकरित्या गु.र.क्र. ७५४/२०२० गुन्हयाची नोंद रात्री २३.५६ वा. पोलीस ठाणे शिक्रापूर, पुणे ग्रामीण पोलीस, गु.र.क्र. ७७३/२०२० गुन्हयाची नोंद सकाळी २.३३ वा. पोलिस ठाणे डेक्कन पुणे शहर पोलिस आयुक्तालय, गु.र.क्र. ३०६ / २०२० गुन्हयाची नोंद सकाळी ००.१० वा. पोलिस ठाणे आळंदी पिपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात, सदरील गुन्हे एकाच दिवशी म्हणजे दिनांक २५ नोव्हेंबर, २०२० रोजी नोंदविण्यात आलेले असणे, तसेच पुणे शहर पोलिस आयुक्तालयाअंतर्गत डेक्कन पोलीस ठाण्यातील गु.र.क्र. ६७३/२०२० हा गुन्हयासाठीच्या कार्यालयीन टिप्पणीत खाडाखोड करून पाने देखील बदलविण्यात आलेली असणे, विशेष आश्चर्याची बाब म्हणजे सदरील गुन्हे हे जरी दिनांक २५ व २६ नोव्हेंबर, २०२० रोजी नोंदविण्यात आलेले असतांना, सदरील गुन्हयाकामी तपासाकरीता जाणा-या अधिकारी व कर्मचा-यांकरीता पूर्वीच म्हणजे दिनांक २३ नोव्हेंबर, २०२० रोजी फर्दापूर येथील अजंता गेस्ट हाउस बुक करण्यात आलेले होते.

या उपरोक्त गंभीर प्रकरणात अभियंता कुणाल शहा व लेखापरीक्षक महावीर चोरडिया यांनी तक्रार दिल्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म.रा. पुणे यांना उपरोक्त गुन्हयासंदर्भात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या गैरप्रकाराबाबतीत चौकशी करण्याचे आदेश दिलेले होते. संबंधित प्रकरणात समोर आलेल्या माहितीच्या आधारे डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यात आली होती. सभागृहातील अनेक सदस्यांनी त्यात सक्रिय सहभाग घेत कारवाईची जोरदार मागणी केली होती.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत समोर आलेल्या तथ्य गंभीर असून आपण महाराष्ट्रात आहोत की बिहारमध्ये असा प्रश्न उपस्थित केला होता. दीड तासात तीन गुन्हे दाखल करणे, कारवाई करताना स्थानिक पोलिसांना न कळविणे, कारवाईसाठी पोहचण्याच्या अगोदरच विश्रामगृह खाजगी व्यक्तीने बुक करणे, तिसऱ्याच व्यक्तीला फॉरेन्सिक ऑडिटचे काम देणे, तक्रारदार नसताना गुन्हा दाखल करणे अशा अनेक बाबी समोर आल्या असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली होती.

संबंधित व्यक्तींची नावे जाहीर करून अधिकारी, कर्मचारी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी आक्रमक मागणी सदस्यांनी केली होती. बीएचआर संदर्भात कारवाई करण्याचा कट कसा रचण्यात आला याचा पुरावा मी विरोधी पक्षनेता असताना याच सभागृहात मांडला होता. कारवाई संदर्भातील अहवाल आताच आमच्याकडे आला असून त्यात कोण कोण कसे सहभागी होते हे सर्व आहे. कारवाईततील संबंधित दोषींवर १ महिन्याच्या आत कारवाई करण्यात येईल आणि आवश्यकता असली तर निलंबन देखील केले जाईल असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

राज्याचे हिवाळी अधिवेशन संपून ३ महिने पूर्ण होत आले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन आज हवेत विरलेले दिसत आहे. अद्याप कुणावरही कारवाई झाली नसल्याचे समोर आलेले नसून येत्या काळात कुणावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button