Other

पाडळसरे पाणीपुरवठा योजनेची आमदार अनिल पाटील यांच्याकडून पाहणी

नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांचीही उपस्थिती; शहर विकासासाठी एकत्रित प्रयत्नांचे संकेत

पाडळसरे पाणीपुरवठा योजनेची आमदार अनिल पाटील यांच्याकडून पाहणी

नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांचीही उपस्थिती; शहर विकासासाठी एकत्रित प्रयत्नांचे संकेत

अमळनेर : शहरातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या १९४.५४ कोटी रुपयांच्या पाडळसरे धरणावरील २४x७ पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या वेगाने सुरू असून रविवारी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत कामाची पाहणी केली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनीही नगरसेवकांसह उपस्थिती लावल्याने शहर विकासासाठी दोन्ही नेतृत्व एकत्र आल्याची चर्चा रंगली.

आमदार अनिल पाटील सकाळी साडेसात वाजता शहर विकास आघाडीचे नगरसेवक व कार्यकर्त्यांसह पाडळसरे धरण परिसरात दाखल झाले. नगराध्यक्ष डॉ. बाविस्कर यांनीही नगरसेवकांसह उपस्थित राहत तापी नदीकाठी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून योजनेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

सदर प्रकल्पांतर्गत एक इंटेकवेल, तीन इन्फेक्शन वेल, एक जॅकवेल तसेच कनेक्टिंग मेनचे काम सुरू असून आतापर्यंत २० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. कामाला अधिक गती देण्याच्या सूचना आमदार अनिल पाटील यांनी दिल्या. नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनीही काही तांत्रिक बाबींविषयी सूचना करत माहिती जाणून घेतली.

यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, अभियंता बैसाणे, मानव सेवा कन्सल्टंट धुळेचे राजेंद्र सोनार व विवेक पाटील, ठेकेदार जितेश ठाकरे व राज राठोड उपस्थित होते. त्यांनी कामाच्या सद्यस्थितीची माहिती दिली.

दोन वर्षांपूर्वी आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांतून १९४.५४ कोटी रुपयांची ही महत्त्वाकांक्षी योजना मंजूर झाली होती. पाडळसरे धरणात वर्षभर जलसाठा उपलब्ध राहत असल्याने ही योजना अमळनेर शहरासाठी दिलासादायक ठरणार आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर शहरवासीयांना दररोज नियमित पाणीपुरवठा होणार आहे.

योजनेअंतर्गत २११.५ किलोमीटरपैकी ९२ किलोमीटरहून अधिक पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच ढेकू रोडवरील नवनाथ टेकडी येथे २८ एमएलटी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे कामही ४० टक्के पूर्ण झाले आहे. याशिवाय १८.६० लक्ष लिटर व १९.५८ लक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभांचे बांधकामही प्रगतिपथावर आहे. या योजनेत सोलर प्रकल्पाची तरतूद असल्याने वीज बिलात मोठी बचत होणार असल्याचेही सांगण्यात आले.

यंदाच्या उन्हाळ्यात अमळनेरकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागल्याने ही योजना लवकर पूर्ण व्हावी यासाठी आमदार अनिल पाटील प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पाहणी दौऱ्यानंतर नगराध्यक्ष व नगरसेवकांनी कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

या प्रसंगी नगरसेवक, नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button