Other

नाना पाटेकर यांच्या निधनाने मातीशी नाळ जोडणारा संवेदनशील माणूस हरपला!

नाना पाटेकर यांच्या निधनाने मातीशी नाळ जोडणारा संवेदनशील माणूस हरपला!

अशोक जैन यांची भावपूर्ण श्रद्धांजली; जैन हिल्सवरील भेटींच्या आठवणींना उजाळा, शेती-माती-पाण्याशी नानांचे जिव्हाळ्याचे नाते

जळगाव, प्रतिनिधी : “नाना पाटेकर यांच्या दुःखद निधनाची वार्ता समजताच अतिशय दुःख झाले. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील कलाकारच नव्हे, तर माती, शेती आणि शेतकऱ्यांशी मनापासून नाते जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे,” अशा शब्दांत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडच्या जैन हिल्स आणि नाना पाटेकर यांच्यातील स्नेहाच्या आठवणींना उजाळा देताना अशोक जैन यांनी सांगितले की, नाना पाटेकर यांनी २००५ आणि २०१५ मध्ये जैन हिल्सला सदिच्छा भेट दिली होती. विशेषतः १६ ऑक्टोबर २०१५ रोजी मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांच्या ‘नाम’ संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जैन हिल्स येथे आयोजित कार्यक्रमात नाना पाटेकर आणि श्रद्धेय मोठेभाऊ भवरलालजी जैन यांची भेट झाली होती. या भेटीदरम्यान शेती, माती आणि पाणी या विषयांवर दोघांमध्ये अत्यंत जिव्हाळ्याने सविस्तर संवाद झाला. हा केवळ औपचारिक संवाद नव्हता, तर मातीवर मनापासून प्रेम करणाऱ्या दोन संवेदनशील व्यक्तींच्या विचारांची ती हृद्य देवाणघेवाण होती.

या भेटीत नाना पाटेकर यांनी जैन हिल्स येथील शेती संशोधन केंद्राला उत्सुकतेने भेट देत तेथे सुरू असलेल्या विविध शेती प्रयोगांची आस्थेने माहिती घेतली. जैन इरिगेशनने विकसित केलेल्या आंब्याच्या रोपांची त्यांनी आपल्या फार्म हाऊससाठी श्रद्धेय मोठेभाऊंकडे मागणी केली होती. त्यानंतर आंबा, पेरू, सीताफळ आणि नारळाची रोपे त्यांच्या फार्म हाऊसवर पाठविण्यात आली. नानांनी ही रोपे केवळ लावली नाहीत, तर मोठ्या प्रेमाने त्यांचे संगोपनही केले.

श्रद्धेय मोठेभाऊ, जैन परिवार आणि नाना पाटेकर यांच्यातील स्नेहाचा हा धागा शेती, माती, पाणी आणि माणुसकीच्या भावनेने घट्ट जोडलेला होता. नाना पाटेकर यांच्या जाण्याने ही स्नेहपूर्ण आठवण अधिकच हळवी झाली आहे. त्यांनी जपलेली मातीशी असलेली नाळ आणि त्यांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत राहतील, अशी भावना अशोक जैन यांनी व्यक्त केली. नाना पाटेकर यांच्या स्मृतींना त्यांनी विनम्र अभिवादन केले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button