भडगाव नगरपरिषदेची मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम सुरू

भडगाव नगरपरिषदेची मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम सुरू
नाले, ड्रेनेज सफाईसह शहरभर युद्धपातळीवर कामांना वेग
भडगाव (प्रतिनिधी) : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी तुंबणे, सांडपाण्याचा अडथळा तसेच पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी भडगाव नगरपरिषदेने मान्सूनपूर्व नाले व ड्रेनेज सफाई मोहिमेला सुरुवात केली आहे. दि. २० मेपासून सुरू करण्यात आलेल्या या विशेष अभियानांतर्गत शहरातील विविध भागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने नालेसफाई, ड्रेनेज साफसफाई तसेच रस्त्यालगत वाढलेले गवत, झाडे-झुडपे आणि मातीचे ढिगारे हटविण्याची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत.
मोहिमेच्या प्रारंभी बाळद रोड परिसरातील ड्रेनेज सफाई हाती घेण्यात आली असून जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर गाळ व कचरा काढण्यात येत आहे. मागील वर्षी पावसाळ्यात नागरिकांना आलेल्या अडचणी लक्षात घेऊन यंदा सर्व प्रमुख नाले आणि पाण्याचा विसर्ग होणाऱ्या मार्गांची व्यापक साफसफाई करण्याचा निर्णय नगरपरिषदेकडून घेण्यात आला आहे.
नगरपरिषदेच्या नियोजनानुसार बाळद रोड दुतर्फा ड्रेनेज, तळणी ते बाळद रोड, जयकिसान कॉलनी-दत्तनगर परिसर, भगीरथ किराणा जवळील काँक्रीट मोरी, जयहिंद कॉलनी, शिवशक्ती कॉलनी, पोलीस लाईन, एच कॉलनी, गणपती मंदिर ते शिवनेरी गेट, सिव्हील हॉस्पिटल परिसर, कोल्हा नाला, ग्रीन पार्क कॉलनी, आदर्श कन्या शाळा परिसर, न्यायालय परिसर तसेच भागवत कॉलनी येथील नालेसफाईचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. दि. २० मे ते ३ जूनदरम्यान ही मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असून पुढील १५ ते २० दिवस शहरभर जेसीबी व मनुष्यबळाच्या सहाय्याने स्वच्छता मोहीम सुरू राहणार आहे.
ही मोहीम लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखाताई मालचे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, गटनेते लखीचंद पाटील आणि आरोग्य सभापती इम्रान अली सय्यद यांच्या सहकार्याने विविध प्रभागांतील लोकप्रतिनिधींनी आरोग्य विभागासोबत समन्वय साधला आहे. प्रभाग क्रमांक ८ मधील नगरसेविका समीक्षाताई पाटील व नगरसेवक अमोल पाटील, प्रभाग ९ मधील नगरसेविका वैशालीताई पाटील व नगरसेवक विजयकुमार भोसले तसेच प्रभाग १० मधील नगरसेविका ज्योतीताई पाटील यांनी समस्याग्रस्त भागांचा आढावा घेत सफाई आराखडा तयार करण्यासाठी पुढाकार घेतला.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, आरोग्य विभागाचे अभियंता सत्यम पाटील, श्रीमती निशा लोट आणि क्लार्क छोटू वैद्य यांनी प्रभागनिहाय नियोजन करून तातडीने कामांना सुरुवात केली आहे. उर्वरित प्रभागांमध्येही लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी विशेष नियोजन केले जात आहे.
विशेष म्हणजे शहरातील कोल्हा नाला, ग्रीन पार्क नाला, टोणगाव नाला, यशवंत नगर नाला तसेच शिवनेरी गेट परिसरातील प्रमुख नाल्यांची व्यापक साफसफाई करण्यात येणार आहे. या मान्सूनपूर्व मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून संभाव्य पावसाळी अडचणी टाळण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.





