Other

शहीद जवानांच्या स्मारकांचे रविवारी भूमिपूजन

शहीद जवानांच्या स्मारकांचे रविवारी भूमिपूजन

क्रांती दिना निमित्त शहीद वीर माता-पिता, वीर पत्नींचा सन्मान; जळगावात कृतज्ञतेचा सोहळा

जळगाव, : देशाच्या संरक्षणासाठी प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून रविवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात ‘शहीद स्मारक भूमिपूजन सोहळा’ आणि शहीद ‘वीर माता, वीर पिता, वीर पत्नी सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जिल्ह्यातील २९ शहीद जवानांच्या स्मारकांचे भूमिपूजन करण्यात येणार असून त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला जाणार आहे.

देशाच्या सुरक्षिततेसाठी स्वतःचे वर्तमान अर्पण करणारे शहीद हे इतिहासाच्या पानांपुरते मर्यादित नसतात. त्यांचे बलिदान तिरंग्याच्या प्रत्येक रंगात आणि राष्ट्रभक्तीच्या प्रत्येक भावनेत सदैव जिवंत राहते. त्यांच्या सर्वोच्च त्यागाला कृतज्ञ अभिवादन करण्याची तसेच शहीद कुटुंबीयांप्रती ऋण व्यक्त करण्याची ही पवित्र संधी आहे.

या सोहळ्यास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी, मान्यवर आणि विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत.

ज्या मातीत या वीर जवानांनी पहिले पाऊल टाकले, ज्या गावाने त्यांना संस्कार दिले आणि ज्या भूमीने राष्ट्रासाठी बलिदान देणारा सुपुत्र घडविला, त्या प्रत्येक शहीद जवानाच्या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, युवक, महिला व ग्रामस्थांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या गावच्या वीर सुपुत्राला सामूहिक मानवंदना देणे, शहीद कुटुंबीयांच्या पाठीशी समाज खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास देणे आणि नव्या पिढीसमोर देशभक्तीचा प्रेरणादायी आदर्श निर्माण करणे, ही प्रत्येक गावाची नैतिक जबाबदारी आहे.

जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांचे परिवार, वीरपत्नी, माजी सैनिक संघटना, एनसीसी कॅडेट्स, विद्यार्थी, युवक तसेच देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहीदांच्या बलिदानाला कृतज्ञ अभिवादन करावे. ही केवळ उपस्थिती नसून राष्ट्रासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीरांना वाहिलेली जिवंत आदरांजली ठरेल, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button