
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । पोलीस दलातील शिस्त आणि जबाबदारीला तडा जाऊ देणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध करत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा करणाऱ्या दोन पोलीस अंमलदारांना तात्काळ निलंबित करण्याची कठोर कारवाई केली आहे. या धडक निर्णयामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, निष्काळजी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिनांक ८ मे रोजी रात्री सुमारे ९:२० वाजता राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, जळगाव यांनी पोलीस अधीक्षक बंगल्यावरील गार्ड ड्युटीची अचानक तपासणी केली. या तपासणीत सफौ/१३७८ संभाजी निबाजी पाटील आणि पोना/३९३ प्रदीप भगतसिंग राजपूत हे दोन्ही अंमलदार ड्युटी पॉईंटवर अनुपस्थित असल्याचे उघड झाले.
या प्रकाराची गंभीरता इतक्यावरच थांबली नाही. तपासणीदरम्यान गार्ड रूममध्ये ठेवण्यात आलेल्या तीन एसएलआर रायफल्स बेवारस अवस्थेत आढळून आल्या. विशेष म्हणजे, संबंधित शस्त्रास्त्रे दारूगोळ्याविना आणि कोणतीही सुरक्षा न राखता निष्काळजीपणे ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारची बेपर्वाई अत्यंत गंभीर मानली जात असून, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियम १९७९ च्या नियम ३ चे हे स्पष्ट उल्लंघन असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
कर्तव्यात चूक आणि शिस्तभंग अजिबात खपवून घेतला जाणार नाही, हा स्पष्ट संदेश देत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दोन्ही अंमलदारांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश निर्गमित केले. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय, जळगाव येथे निश्चित करण्यात आले असून, पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा पोलीस दलात शिस्त, जबाबदारी आणि कर्तव्यनिष्ठेला सर्वोच्च प्राधान्य देणारे अधिकारी म्हणून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची ओळख अधिक ठळक झाली असून, त्यांच्या कणखर आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीची सर्वत्र चर्चा सुरू आहे.





