

पीकपेरा नोंदणीतील तांत्रिक अडचणी दूर करा
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन
जळगाव, प्रतिनिधी : पीकपेरा नोंदणीच्या सॉफ्टवेअरमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद घेण्यात यावी, या मागणीसाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी (दि. २४) जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. शहर जिल्हाध्यक्ष जमीलभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
पीकपेरा नोंदणीची प्रक्रिया सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सुरू असताना अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रत्यक्ष शेतात पिकांची लागवड केलेली असतानाही सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे पीकपेरा नोंदणी करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा, विविध शासकीय योजना आणि कृषीविषयक योजनांचा लाभ घेताना अडचणी येण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर पीकपेरा नोंदणीच्या सॉफ्टवेअरमधील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर कराव्यात. तसेच ज्या शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना अडचणी येत आहेत, त्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून सातबारा उताऱ्यावर पीकपेरा नोंद घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
जिल्हाधिकारी बैठकीसाठी नाशिक येथे गेले असल्याने त्यांच्याऐवजी उपजिल्हाधिकारी ढगे यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले. पीकपेरा नोंदणीची प्रक्रिया सुलभ करून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष पिकांची योग्य नोंद होण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष जमीलभाई शेख, ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर कोळी, अनंत परिहार, राहुल भालेराव, विशाल पवार, सरचिटणीस मालोजीराव पाटील, कफिल अहमद, मुस्ताक सालार, नूर अहमद देशमुख, सखाराम मोरे, मनोज वाणी, मोहम्मद रफिक, शोएब, अलका काळे आदी उपस्थित होते.







